French Open : नदाल, जोकोविच संभाव्य विजेते 

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मे 2019

नदाल स्वतःचा सर्वाधिक जेतेपदांचा विक्रम 12 पर्यंत उंचावणार का याची सर्वाधिक उत्सुकता असेल. नोव्हाक जोकोविचने मागील तीन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तो एकाच वेळी चारही ग्रॅंड स्लॅम करंडक जिंकण्याची कामगिरी कारकिर्दीत दुसऱ्यांदा करणार का हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. 

पॅरिस : फ्रेंच ओपन या टेनिस मोसमातील दुसऱ्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ होत आहे. स्पेनचा रॅफेल नदाल आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांची पुरुष एकेरीत संभाव्य विजेते म्हणून गणना होत आहे. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर सहभागी झालेला स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर क्‍ले कोर्टवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. त्यामुळे चुरस वाढली आहे. 

नदाल स्वतःचा सर्वाधिक जेतेपदांचा विक्रम 12 पर्यंत उंचावणार का याची सर्वाधिक उत्सुकता असेल. नोव्हाक जोकोविचने मागील तीन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तो एकाच वेळी चारही ग्रॅंड स्लॅम करंडक जिंकण्याची कामगिरी कारकिर्दीत दुसऱ्यांदा करणार का हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. 

नदालने गेल्या रविवारी इटालियन ओपन जिंकून मोसमातील पहिलेवहिले जेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्याने जोकोविचला तीन सेटमध्ये हरविले होते. 
गेल्या वर्षी नदालने ही स्पर्धा 11व्या वेळी जिंकली. एकच ग्रॅंड स्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा तो पहिलाच पुरुष टेनिसपटू ठरला. यापूर्वी महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 1960 ते 66, 69 ते 71 व 73 अशा 11 वेळा जेतेपद मिळविले होते. 

जोकोविचला अग्रमानांकन असून 2016 मध्ये हीच स्पर्धा जिंकून सर्व चार करंडक एकाच वेळी जिंकण्याचा पराक्रम केला होता. तेव्हा त्याने 2015 मध्ये विंबल्डन, अमेरिकन, तर 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन व फ्रेंच असे यश मिळविले. गेल्या वर्षी विंबल्डन, अमेरिकन व यंदा ऑस्ट्रेलियन अशी घोडदौड त्याने केली आहे. जोकोविचने माद्रिद ओपन स्पर्धा जिंकत क्‍ले कोर्टवरील फॉर्म दाखवून दिला आहे. 

फेडररने गेली दोन वर्षे तंदुरुस्ती कमाल राहावी म्हणून नियोजन करताना क्‍ले कोर्ट टप्प्यावर काट मारली होती. 2016 मध्ये त्याला पाठदुखीमुळे खेळता आले नव्हते. 2009 मध्ये मिळविलेले जेतेपद त्याचे आतापर्यंतचे एकमेव आहे. तेव्हा त्याने अंतिम फेरीत स्वीडनच्या रॉबिन सॉडर्लिंगला हरविले होते. फेडरर 37 वर्षांचा आहे. कारकिर्दीत 20 ग्रॅंड स्लॅम विजेतिपदे जिंकलेला फेडरर नुकताच माद्रिद ओपनमध्ये खेळला होता. तो उपांत्यपूर्व फेरीत हरला. क्‍ले कोर्टवर तो तीन वर्षांत प्रथमच सहभागी झाला होता. 

नव्या खेळाडूंविषयी 
ऑस्ट्रियाचा डॉमनिक थीम, ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास, जर्मनीचा अलेक्‍झांडर झ्वेरेव यांच्याकडून आशा आहेत, पण त्यांना खेळ कमालीचा उंचावण्याची गरज असेल. इटलीच्या फॅबिओ फॉग्नीनी याने नदालला हरवून मॉंटे कार्लो मास्टर्स विजेतेपद जिंकले होते. त्याच्याशिवाय जपानचा केई निशीकोरी व अर्जेंटिनाचा जुआन मार्टिन डेल पोट्रो कसा खेळ करतो यावर चुरशीची तीव्रता अवलंबून आहे. 

मला माझ्या खेळाविषयी तसेच क्‍ले कोर्टवर खेळताना छान वाटते आहे. मी जिंकणार का हा प्रश्‍न माझ्यासाठीच मोठा आहे. फॉर्मातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध माझा खेळ मोक्‍याच्या वेळी पुरेसा परिणामकारक ठरणार का हे मी सांगू शकत नाही. 
- रॉजर फेडरर 

एकाच वेळी चारही ग्रॅंड स्लॅम करंडक जिंकण्याची संधी मला अतिरिक्त प्रेरणा देणारी आहे. तीन वर्षांपूर्वी मी यात यशस्वी ठरलो होतो. त्यामुळे आता पुन्हा असे करून दाखवू शकू, असा विश्‍वास वाटतो आहे. माझ्यासमोर इतर कुणापेक्षाही सर्वांत मोठे आव्हान असेल ते नदालचे. जो नंबर एकचा फेव्हरीट आहे. 
- नोव्हाक जोकोविच 

तुम्ही मंडळी विजेतेपद मागत होतात आणि अखेरीस माझ्याकडे ते आले आहे. माझ्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगले खेळणे आणि तंदुरुस्त राहणे. तसे घडत असेल तर मी यथावकाश जेतेपदासाठी झुंजतो असा अनुभव आहे. ही पातळी मी मागील स्पर्धेत गाठली. मी फेव्हरीट असेन तर त्याची चिंता वाटत नाही. दोन आठवड्यांनी तो करंडक जिंकून मायदेशी जातो तोच फेव्हरीट असतो. 
- रॅफेल नदाल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rafael Nadal and Novak Djokovic top container in French Open tennis