नदाल दसनंबरी मनसबदार 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

मॉंटे कार्लोमध्ये दहा वेळा जिंकणे मोठी गोष्ट आहे. मला शब्दच सुचत नाहीत. माझा फोरहॅंड छान जुळून आला. या स्पर्धेत भक्कम खेळ झाला. आजचा दिवस जल्लोषाचा आहे. उद्यापासून मी बार्सिलोनातील स्पर्धेवर लक्ष केंद्रित करेन. 
- नदाल 

मॉंटे कार्लो - स्पेनचा मातब्बर टेनिसपटू मॉंटे कार्लो मास्टर्स स्पर्धेत नदालने एकेरीचे विजेतेपद मिळविले. कारकिर्दीत त्याने दहाव्यांदा ही स्पर्धा जिंकली. एप्रिल 1968 मध्ये टेनिसमध्ये व्यावसायिक युग (ओपन एरा) सुरू झाल्यापासून एका टेनिसपटूने एका स्पर्धेत दहा वेळा विजेतेपद मिळविण्याची ही पहिली वेळ ठरली. यामुळे नदालची कामगिरी ऐतिहासिक ठरली. 

नदालने अंतिम सामन्यात देशबांधव अल्बर्ट रॅमोस- विनोलास याला 6-1, 6-3 असे हरविले. त्याने एक तास 16 मिनिटांत सामना जिंकला. एटीपी मास्टर्स 1000 मालिकेतील हे त्याचे 29वे विजेतेपद आहे. नोव्हाक जोकोविच याच्या नावावर सर्वाधिक 30 विजेतेपदांचा उच्चांक आहे. 

नदालने क्‍ले कोर्टवर 50वे विजेतेपद पटकावले. ही कामगिरीसुद्धा विक्रमी ठरली. त्याने गेल्या वर्षी बार्सिलोना ओपन जिंकून गुलेर्मो विलास यांच्या उच्चांकाशी बरोबरी केली होती. ती स्पर्धा त्याने नवव्यांदा जिंकली होती. नदालने या स्पर्धेत 63 विजय आणि चार पराभव अशी कामगिरी केली आहे. 

नदालचे हे मोसमातील पहिलेच विजेतेपद आहे. त्याने 2004 पासून सलग 14व्या वर्षी किमान एक एटीपी विजेतेपद मिळविले आहे. अंतिम सामत्याने त्याने 70 विजय आणि 35 अशी कामगिरी केली आहे.

मॉंटे कार्लोमध्ये दहा वेळा जिंकणे मोठी गोष्ट आहे. मला शब्दच सुचत नाहीत. माझा फोरहॅंड छान जुळून आला. या स्पर्धेत भक्कम खेळ झाला. आजचा दिवस जल्लोषाचा आहे. उद्यापासून मी बार्सिलोनातील स्पर्धेवर लक्ष केंद्रित करेन. 
- नदाल 
 

Web Title: Rafael Nadal claims 10th Monte Carlo Masters title