राहीचा सुवर्णपदक खर्च 45 लाखांवर 

संजय घारपुरे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई : नेमबाजीत पुनरागमन करण्याचे ठरविले, त्या वेळी चांगले वैयक्तिक मार्गदर्शक आवश्‍यक होते. मला कोणाची फारशी मदत नाही, तरीही यापूर्वीच्या जिंकलेल्या बक्षीस रकमेतून त्याचे मानधन देत आहे. ते सत्कारणी लागत आहे, असे आशियाई क्रीडा स्पर्धा विजेत्या राही सरनोबतने सांगितले. 

मुंबई : नेमबाजीत पुनरागमन करण्याचे ठरविले, त्या वेळी चांगले वैयक्तिक मार्गदर्शक आवश्‍यक होते. मला कोणाची फारशी मदत नाही, तरीही यापूर्वीच्या जिंकलेल्या बक्षीस रकमेतून त्याचे मानधन देत आहे. ते सत्कारणी लागत आहे, असे आशियाई क्रीडा स्पर्धा विजेत्या राही सरनोबतने सांगितले. 

दुखापतीमुळे राही आघाडीच्या क्रीडापटूंना आर्थिक पाठबळ देणाऱ्या टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीमचा भाग नाही. त्यामुळे तिला वैयक्तिक मार्गदर्शक मुखाबायार दॉरजसुरेन यांचे महिन्याला मानधन स्वखर्चातून द्यावे लागते. हे मानधन साडेचार हजार युरो म्हणजेच साडेतीन लाख रुपयांपेक्षाही जास्त आहे. राही हे मानधन जवळपास एक वर्ष स्वतःच्या खर्चातून देत आहे. त्याचाच अर्थ तिने सुवर्णपदकासाठी आत्तापर्यंत जवळपास 45 लाख रुपये मार्गदर्शनासाठीच दिले आहेत. 

मुखाबायार दॉरजसुरेन या पंचवीस वर्षापूर्वीच निवृत्त झाल्या आहेत. त्यांच्याबरोबर गतवर्षीच्या जुलैत मी एक कॅम्प केला. त्यानंतर लगेचच त्यांना वैयक्तिक मार्गदर्शक नियुक्त करण्याचे ठरवले. त्यांचे शुल्क खूपच जास्त आहे. माझ्या सध्याच्या पगारातून तर हे देणे अवघडच होते. ऑलिंपिक गोल्ड क्वेस्टचे साह्य आहे, पण ते पुरेसे नाही. त्यामुळे राष्ट्रकुल, क्रीडा, विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर मिळालेल्या बक्षीस रकमेतून हे मानधन देण्याचे ठरविले, असे राहीने सांगितले. अर्थातच तिला आता आपल्याला टॉप्समध्ये स्थान मिळेल आणि हा प्रश्‍न सुटेल, अशी आशा आहे. 

आशियाई क्रीडा नेमबाजीत सुवर्णपदक जिंकलेली आपण महिला आहोत हे कळताच धक्का बसला. हे पदक माझ्यासाठी खूपच मोलाचे आहे. या पदकाने माझे अवकाश पुन्हा खुले झाले. आपण पूर्वीसारख्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकू शकतो, असा विश्‍वास दिला 
- राही सरनोबत 

Web Title: Rahee's Gold Medal Expenses At 45 Lacs