राष्ट्रीय विक्रमानंतरही राही पदकापासून दूर

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मुंबई - राही सरनोबतने विश्‍वकरंडक नेमबाजीतील २५ मीटर स्पोर्टस्‌ पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत राष्ट्रीय विक्रम केला; पण तिला पदकाचा वेध घेण्यात अपयश आले. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी कोरिया विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताची पदकाची पाटी कोरीच राहिली.

मुंबई - राही सरनोबतने विश्‍वकरंडक नेमबाजीतील २५ मीटर स्पोर्टस्‌ पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत राष्ट्रीय विक्रम केला; पण तिला पदकाचा वेध घेण्यात अपयश आले. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी कोरिया विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताची पदकाची पाटी कोरीच राहिली.

पाच वर्षांपूर्वी राहीने चाँगवॉन विश्‍वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने पात्रतेत ५८८ गुण मिळवून अव्वल क्रमांक मिळविला. त्याचबरोबर राष्ट्रीय विक्रम तीन गुणांनी सुधारला; पण अंतिम फेरीत तिची सुरवात खराब झाली. त्यातच सहाव्या फेरीत तिला एकदा दोन गुणांचाच वेध घेता आला. त्यानंतर तिची पीछेहाटच झाली. ऑस्ट्रेलियाची एलेना गॅलिआबोविच आणि चीनची युशी याओ यांनी राहीला एका गुणाने मागे टाकत पदकाच्या शर्यतीतून बाद केले. राष्ट्रकुल स्पर्धेत एलेनास हीनाने सहज मागे टाकले होते; पण तीच हीना या वेळी ३७ व्या क्रमांकावर गेली. अन्नूराज सिंग (५७३) ४१ वी आली.  

अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत बाद होणारी पहिली जोडी ठरले. तिसऱ्या फैरीनंतर त्यांचे ३५१ गुण होते; तर इटलीच्या जोडीचे ३५१.१. पहिल्या फैरीनंतर दुसरे असलेल्या भारतीय जोडीची त्यानंतरच्या दोन फैरीत घसरण झाली. दीपक कुमार-मेहुली घोष पात्रता स्पर्धेतच आठवे आले होते, त्यामुळे अंतिम फेरीपासून दूर राहिले. 

राष्ट्रकुल विजेती ३३वी
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डबल ट्रॅपमधील सुवर्णपदक विजेत्या श्रेयासी सिंह हिला ट्रॅप प्रकारात ३३ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिचे १०६ गुण झाले. शगुन चौधरीने (१०८) २६वा क्रमांक मिळवत श्रेयासीला मागे टाकले. सीमा तोमर (९९) ४७ वी आली. पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत मानवजित सिंग संधू (४८) दोन फेऱ्यानंतर नववा आहे. झोरावर सिंग (४७) तेरावा; तर क्‍यानन चेनाई (४६) ३६ वा आहे.

Web Title: rahi sarnobat away from medal