खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात कपात करणार - राठोड

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - देशात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी एक पाऊल टाकताना खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून पन्नास टक्के कपात करणार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सोमवारी सांगितले.

नवी दिल्ली - देशात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी एक पाऊल टाकताना खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून पन्नास टक्के कपात करणार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सोमवारी सांगितले.

क्रीडा क्षेत्रात भारत अजूनही खूप मागे आहे. त्यासाठी आधी क्रीडा संस्कृती रुजणे आवश्‍यक आहे. जेव्हा शाळेपासून खेळाला महत्त्व येईल, तेव्हा हे शक्‍य होईल, असे सांगून राठोड म्हणाले, ‘‘आपल्याकडे खेळ एक शिक्षण आहे, हेच विसरले जात आहे. त्याचे शिक्षण घेतल्याशिवाय त्यात परिपूर्णता येत नाही. शालेय शिक्षण मंत्रालयाशी चर्चा करून पुढील वर्षीपासून अभ्यासक्रमात ५० टक्के कपात करण्यात येणार आहे. हा निर्णय झाल्यावर शाळेत क्रीडा विषय अनिवार्य केला जाईल.’’

क्रीडा क्षेत्राच्या प्रसारासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात असल्याचेही राठोड यांनी या वेळी सांगितले. राठोड म्हणाले,‘‘या वर्षी आमच्याकडे खास खेळासाठीच्या २० शाळा आहेत. सरकारने त्यांच्यावर ७ ते १० कोटी रुपये खर्च केले आहेत. आता आम्ही हीच योजना प्रत्येक शाळांमध्ये घेऊन जाणार आहोत. त्यांना किमान दोन ते तीन खेळांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात येईल.’’

पुढील वर्षी होणाऱ्या रग्बी विश्‍वकरंडक स्पर्धेचा करंडक आज भारत दौऱ्यावर आला. करंडकाच्या स्वागत सोहळ्यानंतर राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी क्रीडा सचिव राहुल भटनागर, साईच्या संचालिका नीलम कपूर, भारतीय ऑलिंपिक संघटना सचिव राजीव मेहता उपस्थित होते. 

क्रीडा मंत्रालयाने २०२२ पर्यंत ‘साई’च्या (आता एसआय) मनुष्यबळात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संस्थेला खेळाकडे पूर्ण लक्ष देता येईल आणि सर्वाधिक पैसा खेळावर खर्च होईल.
-राज्यवर्धनसिंग राठोड, केंद्रीय क्रीडामंत्री

Web Title: Rajyavardhan Singh Rathore hints at reduction of school syllabus by fifty percent