रामचंद्र गुहांचा BCCI प्रशासकीय समितीचा राजीनामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

गुहा यांनी राय यांच्याकडे गेल्या 28 मे रोजी राजीनामा सोपविल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयास दिली. गुहा यांनी हा राजीनामा वैयक्तिक कारणांसाठी देत असल्याचे म्हटले आहे. गुहा यांच्या राजीनाम्यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च्च न्यायालयासमोर येत्या 14 जून रोजी होणार आहे...

नवी दिल्ली - ज्येष्ठ विचारवंत व प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) नेमण्यात आलेल्या चार सदस्यीय प्रशासकीय समितीच्या सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिला आहे.

बीसीसीआयने लोढा समितीकडून करण्यात आलेल्या शिफारशी स्वीकाराव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रशासकीय समितीची नेमणूक करण्यात आली होती. "अनुत्सुक' बीसीसीयला या शिफारशींचा स्वीकार करण्यास "मदत' करणे, हे या समितीस नेमून दिलेले कार्य होते. माजी महालेखापाल विनोद राय हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये डायना एडलजी व विक्रम लिमये या अन्य दोन सदस्यांचा समावेश आहे.

गुहा यांनी राय यांच्याकडे गेल्या 28 मे रोजी राजीनामा सोपविल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयास दिली. गुहा यांनी हा राजीनामा वैयक्तिक कारणांसाठी देत असल्याचे म्हटले आहे. गुहा यांच्या राजीनाम्यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च्च न्यायालयासमोर येत्या 14 जून रोजी होणार आहे.

"गुहा यांच्या राजीनाम्याचे वृत्त खरे आहे अथवा नाही, याची कल्पना नाही. त्यांचा दूरध्वनी बंद आहे; व त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही. समितीकडे यासंदर्भातील कोणतीही माहिती नाही. गुहा यांच्या राजीनाम्याचे वृत्त धक्कादायक आहे,'' अशी प्रतिक्रिया एडलजी यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली.

बीसीसीआय व भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील ठरण्याची शक्‍यता असलेले काही निर्णय आता या प्रशासकीय समितीकडून घेतले जाणे अपेक्षित असतानाच गुहा यांनी हा राजीनामा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर, आता सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणामधील भूमिकेविषयी उत्सुकता आहे.

Web Title: Ramachandra Guha resigns from BCCI’s panel of administrators