विश्‍वकरंडक तयारीवर रमजानचा परिणाम? 

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

हा वैयक्तिक प्रश्‍न 
रमजान या आठवड्यात संपेल; पण त्याच कालावधीत सौदी अरेबिया, इजिप्त, मोरोक्कोच्या सलामीच्या लढती होतील. खेळाडूंना यातून सूटही दिली जाते; मात्र ट्युनिशियाचे खेळाडू यास तयार नाहीत. इजिप्त संघाच्या सपोर्ट स्टाफने कोणत्याही वैयक्तिक खेळाडूबाबत बोलणे टाळले आहे. ट्युनिशिया मार्गदर्शकांनीही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्‍न असल्याचे सांगितले; मात्र रोजा असताना 30 मिनिटांनंतर धावणे अवघड होते, अशी कबुली काही खेळाडूंनी खासगीत दिली. 

मॉस्को, ता. 12 ः ऐन रमजानमध्ये खडतर विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा खेळण्याच्या आव्हानास मुस्लिम देश आणि खेळाडू सामोरे जात आहेत. खेळाडूंच्या तंदुरुस्तीवरही त्याचा परिणाम होत आहे. रोजे पाळणारा ट्युनिशियाचा गोलरक्षक तर विश्‍वकरंडकातील सराव लढत सुरू असताना मैदानात पडला होता. 

रमजान सुरू असल्यामुळे मुस्लिम खेळाडू सूर्योदय ते सूर्यास्तादरम्यान अन्न-पाणी वर्ज्य करतात. ट्युनिशियाने यावर उपाय शोधला आहे. संघासोबतचे पथक पाण्याच्या बाटल्या, तसेच खजूर घेऊन सज्ज असते. खजूर खाऊन आणि पाणी पिऊन रोजा सोडता येतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. 

विश्‍वकरंडकातील सरावाच्या लढती उशिरा खेळवण्याचा ट्युनिशियाचा प्रयत्न होता; पण तो यशस्वी झाला नाही. पोर्तुगाल, तसेच तुर्कीविरुद्ध लढत सुरू असतानाच सूर्यास्त झाला आणि खेळाडूंनी त्या वेळी रोजा सोडण्याठी ब्रेक घेतला होता. 

ट्युनिशिया, इजिप्त, मोरोक्को, सेनेगल, सौदी अरेबिया, इराण आणि नायजेरिया संघांत मुस्लिम खेळाडू आहेत. रमजान लक्षात घेऊन आम्ही सर्व वेळापत्रक तयार केले आहे. अर्थात हे सोपे नसते. खेळाडूंचे खाणे, सराव, विश्रांती हे सर्व लक्षात घेऊन कार्यक्रम तयार करावा लागतो, असे इजिप्त संघासोबतचे डॉक्‍टर मोहंमद अबोलेला यांनी सांगितले. रमजान संपल्यानंतरही कार्यक्रमात अचानक पूर्ण बदल करता येत नाही. त्याच्याशी जुळवून घेण्यासही वेळ लागतो, असेही त्यांनी सांगितले. 

हा वैयक्तिक प्रश्‍न 
रमजान या आठवड्यात संपेल; पण त्याच कालावधीत सौदी अरेबिया, इजिप्त, मोरोक्कोच्या सलामीच्या लढती होतील. खेळाडूंना यातून सूटही दिली जाते; मात्र ट्युनिशियाचे खेळाडू यास तयार नाहीत. इजिप्त संघाच्या सपोर्ट स्टाफने कोणत्याही वैयक्तिक खेळाडूबाबत बोलणे टाळले आहे. ट्युनिशिया मार्गदर्शकांनीही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्‍न असल्याचे सांगितले; मात्र रोजा असताना 30 मिनिटांनंतर धावणे अवघड होते, अशी कबुली काही खेळाडूंनी खासगीत दिली. 

Web Title: Ramjans imapct on World Cup preparations?