रामकुमारच्या अपयशाने पदके घटली- झीशान

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला किमान पाच पदकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात भारताला तीनच पदकांवर समाधान मानावे लागले. अनुभवी लिएंडर पेसने ऐनवेळी घेतलेली माघार आणि रामकुमारला आलेले अपयश यामुळे आम्ही पाच पदकांचे उद्दिष्ट गाठू शकलो नाही, असे मत भारताचे प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. 
 

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला किमान पाच पदकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात भारताला तीनच पदकांवर समाधान मानावे लागले. अनुभवी लिएंडर पेसने ऐनवेळी घेतलेली माघार आणि रामकुमारला आलेले अपयश यामुळे आम्ही पाच पदकांचे उद्दिष्ट गाठू शकलो नाही, असे मत भारताचे प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. 

ते म्हणाले, ""पाच पदकांच्या शर्यतीत पेसच्या माघारीने आधीच धक्का बसला. त्यानंतर एकेरीत रामकुमारने खूपच निराशा केली. पेसचा धक्का जितका मोठा होता, तितकाच धक्का रामच्या अपयशाने बसला. गेले सहा महिने तो चांगले टेनिस खेळतोय. त्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने खेळ केला. त्याचा फटका आम्हाला बसला.'' 

भारताने गेल्या इन्चॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीतील सुवर्णासह पाच पदके मिळविली होती. या वेळी पुरुष दुहेरी सुवर्ण, पुरुष एकेरी आणि महिला एकेरी ब्रॉंझ, अशी तीन पदकेच भारताला मिळाली. झीशान अली म्हणाले, ""भारताने पुरुष एकेरीत दोन आणि मिश्र दुहेरीतही पदक जिंकणे अपेक्षित होते. प्रज्ञेशने कामगिरी उंचावल्याने पुरुष एकेरीतील एक तरी पदक मिळाले. रामला उपांत्य फेरी गाठणेही जमले नाही.'' 

झीशान अली यांनी सांगितले, ""पेसच्या माघारीचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे पुरुष आणि मिश्र दुहेरीतील जोडी नव्याने जुळवण्यापासून सुरवात करावी लागली. मिश्र दुहेरीतील अंकिता-बोपण्णा, कामरान-दिवीज या जोड्या अगदी ऐनवेळी तयार करण्यात आल्या.'' 

रोहन आणि दिवीज जोडी चांगली जुळली आहे. भवि÷यात त्यांनी आणखी काही स्पर्धा एकत्र खेळल्यास त्यांच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. पण, म्हणून ते ऑलिंपिक पदक जिंकू शकतील, असे म्हणणे योग्य होणार नाही. त्यांना स्थिरावण्यास वेळ मिळायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पेसची उणीव जाणवलीच. पुरुष आणि मिश्र दुहेरीत जोड्या जुळवण्याचे काम पार पाडले, तरी पेसच्या अनुभवाने फरक पडला असता. तो खेळला असता, तर चित्र वेगळे दिसले असते. त्याची उणीव जाणवलीच. - झीशान अली, भारताचे प्रशिक्षक 

Web Title: Ramkumar's failure reduced the medal says Zeeshan