विदर्भाचा ५९ धावांत खुर्दा

विदर्भाचा ५९ धावांत खुर्दा

महाराष्ट्राच्या संकलेचाचे सात बळी; शेखचे सलग दुसरे शतक

नागपूर - महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी ईडन गार्डन्सच्या ‘ग्रीनटॉप विकेट’वर  विदर्भाचा पहिला डाव अवघ्या ५९ धावांत गुंडाळून रणजी करंडक (‘ब’ गट) क्रिकेट स्पर्धेतील पाचव्या साखळी सामन्यात धमाकेदार सुरवात केली. महाराष्ट्रने दिवसअखेर ३ बाद २४० अशी मजल मारत सामन्यावरील आपली पकड घट्ट केली. अनुपम सांकलेचाचे सात बळी आणि त्यानंतर नौशाद शेखचे सलग दुसरे शतक हे महाराष्ट्राच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. 

महाराष्ट्रचा कर्णधार केदार जाधवने गवत असलेल्या खेळपट्टीवर महत्त्वाची नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मध्यमगती गोलंदाज अनुपम संकलेचाने सकाळच्या अनुकूल स्थितीचा पुरेपूर फायदा घेत विदर्भाची दाणादाण उडविली. आघाडी फळीतील संजय रामास्वामीला शून्यावर आणि कर्णधार फैज फजलला सात धावांवर तंबूत पाठविल्यानंतर संकलेचाने मधली फळी व तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करून उपाहारापूर्वीच विदर्भाचा डाव ५९ धावांतच गुंडाळला. विदर्भाला गुंडाळण्यासाठी महाराष्ट्रला केवळ २९ षटके लागली. संकलेचाने कारकिर्दीमधील सर्वोत्तम प्रदर्शन करीत केवळ २५ धावांत सात गडी बाद केले; तर प्रदीप दाढेने दोन गडी बाद केले. विदर्भाकडून केवळ शलभ श्रीवास्तव (१९) यालाच दुहेरी आकडा गाठता आला. 

प्रत्युत्तरात महाराष्ट्रने सावध फलंदाजी करीत दिवसअखेर ३ बाद २४० धावा केल्या. नौशाद शेखने नाबाद शतक (नाबाद १११ धावा, १५६ चेंडू, १९ चौकार, १ षटकार) ठोकून महाराष्ट्रला मजबूत स्थितीत पोचविले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा शेखसोबत अंकित बावणे ७५ धावांवर खेळत होता. 

संक्षिप्त धावफलक
विदर्भ सर्वबाद ५९ (शलभ श्रीवास्तव १९, अनुपम सांकलेचा ७-२५, प्रदीप दाढे २-११) वि. महाराष्ट्र पहिला डाव ३ बाद २४० (नौशाद शेख खेळत आहे १११, अंकित बावणे खेळत आहे ७५, ललित यादव २-५९).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com