क्रिस्तसमोर कर्नाटकाची दाणादाण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

विशाखापट्टण - वेगवान गोलंदाज अश्‍विन क्रिस्तच्या भेदक माऱ्यासमोर रणजी करंडक उपांत्यपूर्व लढतीत पहिल्याच दिवशी माजी विजेत्या कर्नाटकाची दाणादाण उडाली. त्यांचा पहिला डाव अवघ्या 88 धावांत आटोपला. त्यानंतर दिवसअखेरीस तमिळनाडूने 4 बाद 111 धावा करून पहिल्या डावात आघाडी मिळविली. 

विशाखापट्टण - वेगवान गोलंदाज अश्‍विन क्रिस्तच्या भेदक माऱ्यासमोर रणजी करंडक उपांत्यपूर्व लढतीत पहिल्याच दिवशी माजी विजेत्या कर्नाटकाची दाणादाण उडाली. त्यांचा पहिला डाव अवघ्या 88 धावांत आटोपला. त्यानंतर दिवसअखेरीस तमिळनाडूने 4 बाद 111 धावा करून पहिल्या डावात आघाडी मिळविली. 

हिरव्यागार खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्याचा अचूक फायदा क्रिस्तने तमिळनाडूला मिळवून दिला. कारकिर्दीत 22वा सामना खेळणाऱ्या क्रिस्तने (6-31) सर्वोत्तम कामगिरी करताना पहिल्या दिवसाच्या खेळपट्टीवर तमिळनाडूची मोहोर उमटवली. टी. नटराजन आणि के. विग्नेश या सातवाच सामना खेळणाऱ्या गोलंदाजांनी त्याला पूरक साथ दिली. कर्नाटकाच्या काही फलंदाजांनी आत्मघातकी फटके खेळून आपल्या विकेट गमावल्या. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात भारताच्या साडेसातशे धावांत पाचशे धावांचा वाटा उचलणारी लोकेश राहुल आणि करुण नायर ही जोडी आज अपयशी ठरली. दोघांच्या मिळून केवळ 18 धावा झाल्या. 

पहिल्याच षटकात नटराजनने राहुलची विकेट मिळविली. त्याच्या आउटस्विंगरने राहुलच्या बॅटची कड घेतली आणि दुसऱ्या स्लिपमध्ये बाबा अपराजित याने सुरेख झेल टिपला. समोरच्या बाजूने क्रिस्तच्या गोलंदाजीवर के. अब्बासने हीच चूक केली आणि गलीत विजय शंकरने त्याला टिपले. सत्तर मिनिटे तग धरलेल्या आर. समर्थला नटराजनने आपल्या दुसऱ्या हप्त्यात बाद केले. त्यानंतर बढती मिळालेल्या अभिमन्यू मिथुनलाही त्याने बाद केले. मनीष पांडे आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी ऍक्रॉस खेळत आपल्या विकेट बहाल केल्या आणि उपाहाराला कर्नाटकाची स्थिती 6 बाद 72 अशी दयनीय झाली. उपाहारानंतर अर्ध्या तासात कर्नाटकाचा पहिला डाव आटोपला. उर्वरित चारपैकी तीन गडी क्रिस्तने बाद केले. खेळपट्टीचे स्वरूप आणि वेगवान गोलंदाजांची अचूक कामगिरी यामुळे तमिळनाडूचा डावखुरा फिरकी गोलंदाज औशिक श्रीनिवास याचा उपयोग करून घेण्याची वेळच आली नाही. 

त्यानंतर तमिळनाडूची सुरवातदेखील फार काही वेगळी झाली नाही. मात्र, दिनेश कार्तिकच्या अनुभवाने त्यांना तारले. श्रीनाथ अरविंदने तमिळनाडूची सलामीची जोडी झटपट बाद केली. बिन्नीने इंद्रजितचा अडसर दूर केला. त्यानंतर कार्तिक आणि विजय शंकर यांनी चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करून तमिळनाडूला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. खेळ संपण्यास तीनच षटकांचा अवधी असताना शंकर (34) धावबाद झाला. खेळ थांबला तेव्हा कार्तिक 31; तर अभिनव मुकुंद 3 धावांवर खेळत आहे. 

संक्षिप्त धावफलक ः 
कर्नाटक पहिला डाव (37.1 षटकांत) सर्वबाद 88 (मनीष पांडे 28, अश्‍विन क्रिस्त 6-31, नटराजन 3-18) वि. तमिळनाडू पहिला डाव 36 षटकांत 4 बाद 111 (दिनेश कार्तिक खेळत आहे 31, विजय शंकर 34, अभिमन्यू मिथुन 2-14) 

Web Title: ranji trophy karnataka vs tamilnadu