
Ranji Trophy 2023: मुंबई-महाराष्ट्रात ‘उपउपांत्यपूर्व’ लढत
Ranji Trophy 2023 : मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यात उद्यापासून रणजी क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामना सुरू होत आहे, परंतु गुणांची स्थिती पाहता या दोघांसाठी हा सामना उपउपांत्यपूर्व सामन्यासारखाच आहे.
पहिल्या डावात आघाडी किंवा निर्णायक विजय मिळवणारा संघ बाद फेरीत प्रवेश करेल, असे सध्याचे समीकरण आहे.
ब गटातून सौराष्ट्रने सहा सामन्यांतून २६ गुण मिळवत बाद फेरी निश्चित केली आहे. त्यांचा सामना तमिळनाडूविरुद्ध होत आहे. या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी सौराष्ट्रला काही फरक पडणार नाही.
त्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी मुंबई किंवा महाराष्ट्र यांच्यातच स्पर्धा आहे. मुंबईचे २३; तर महाराष्ट्राचे २५ गुण आहेत. यापैकी एका संघाला सौराष्ट्राची गुणसंख्या पार करण्याची संधी आहे.
काय आहेत समीकरणे?
मुंबईने पहिल्या डावात आघाडी घेतली आणि सामना अनिर्णित राहिला, तर दोघांचे प्रत्येकी २६ गुण होतील; तर कोणी अधिक बोनस मिळवले हे पाहिले जाईल. मुंबईने दोन बोनस गुणांची कमाई केलेली आहे; तर महाराष्ट्राला एकही बोनस गुण मिळवता आलेला नाही.
सौराष्ट्राने त्यांचा सामना गमावला आणि मुंबईने पहिल्या डावात आघाडी घेतली, परंतु सामना अनिर्णित राहिला तर तिघांचे प्रत्येकी २६ गुण होतील. तरीही सौराष्ट्र पुढे जाईल, कारण सौराष्ट्राने मुंबईविरुद्धचा सामना जिंकलेला आहे.
एकूणच पहिल्या डावात आघाडी मिळवण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रामध्ये उद्या सामन्यात पहिली चुरस असणार आहे, परंतु सामना गमावणार नाही यासाठीही प्राधान्य द्यावे लागणार आहे.
प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती
विक्रमी त्रिशतक करणारा पृथ्वी शॉ याची भारतीय ट्वेन्टी-२० संघात निवड झाल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत मुंबईला खेळावे लागणार आहे, पण त्याच वेळी महाराष्ट्राला ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांच्याशिवाय खेळावे लागणार आहे.
सर्फराझ खानवर लक्ष
सातत्यपूर्ण धावा करूनही भारतीय कसोटी संघासाठी विचार न झाल्यामुळे सर्फराझ खान निराश झाला आहे. त्याचा परिणाम दिल्लीविरुद्धच्या सामन्यात झाला होता. आता मात्र सर्व निराशा मागे टाकून त्याला मुंबईसाठी पुन्हा जोरदार लढा द्यावी लागणार आहे.