कोहली-शास्त्रींच्या मनमानीमुळे भारतीय संघात फूट?

Virat Kohli, Ravi Shastri
Virat Kohli, Ravi Shastri

नवी दिल्ली : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर भारतीय क्रिकेटचे रण पेटले आहे. फलंदाजीची क्रमवारी, त्यावरून कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा एकीकडे सुरू असताना कोहली-शास्त्री यांच्या संघातील मनमानीविरुद्ध संघात दुफळी निर्माण झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरत आहे. 

फलंदाजीच्या चौथ्या क्रमांकावर अगोदरच वाद झाले आहेत. त्यातच उपांत्य सामन्यात धोनीला खालच्या क्रमांकावर का फलंदाजीस पाठविले, यावरून बीसीसीआयचे पदाधिकारी शास्त्रींवर उघड नाराजी व्यक्त करीत आहेत. 

काही खेळाडू शास्त्री-कोहली कोणालाही न विचारता स्वतः निर्णय घेत असल्याचे बोलत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. परंतु कोणीही त्यास दुजोरा दिलेला नाही. भारतीय संघ रविवारी इंग्लंडहून प्रयाण करणार आहे. मात्र, उपकर्णधार रोहित शर्मा शुक्रवारी रात्रीच मुंबईत दाखल झालेला आहे. 

बीसीसीआयचे पदाधिकारी प्रसाद यांच्यावर नाराज 
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारतीय संघाच्या एकूणच कामगिरीबाबत कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची हजेरी प्रशासकीय समिती घेणार आहे. त्याचबरोबर निवड समितीने फलंदाजीच्या चौथ्या क्रमांकाबाबत केलेला घोळ, याबाबत निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनाही जाब विचारावा लागेल, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या संघनिवडीपासून फलंदाजीच्या चौथ्या क्रमांकावरून टीका सुरू झाली होती. थ्री-डी खेळाडू असे संबोधून त्या जागेसाठी विजय शंकरची निवड करण्यात आली. शिखर धवन जमखी झाल्यावर राहुलला सलामीला बढती देण्यात आली. पण, विजय शंकर स्पर्धेबाहेर गेला आणि त्याच्याऐवजी सलामीवीर मयांक अगरवालची निवड करण्यात आली. या साप-शिडीच्या खेळाबाबत बीसीसीआयचे पदाधिकारीही प्रसाद यांच्यावर नाराज झाले आहेत. 

संघ जिंकल्यावर निवड समिती बीसीसीआयकडून देण्यात येणाऱ्या बक्षिसाचे जसे हक्कदार ठरते, तसेच पराभवाचेही वाटेकरी ठरले पाहिजे, याची जबाबदारी त्यांनीही स्वीकारली पाहिजे. त्यांनी उत्तरदायित्व घेतले पाहिजे, अशा शब्दांत बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सुनावले आहे. 

निवड समितीचे अध्यक्ष संघाबरोबर प्रत्येक दौऱ्यावर जात असतात. संघात कोणत्या गोष्टींची कमतरता असते, हे त्यांना समजायला हवे होते. चौथ्या क्रमांकाच्या संगीत खुर्चीबाबत त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यांच्यामुळे हा घोळ झाला असल्याचेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com