
INDW vs ENGW : 4, 4, 4, 4, 6, 6 रिचा शेवटपर्यंत लढली, स्मृतीही भिडली मात्र...
INDW vs ENGW Women's T20 World Cup :आयसीसी टी 20 महिला वर्ल्डकप 2023 मधील आजच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 11 धावांनी पराभव करत आपले ग्रुपमधील पहिले स्थान अबाधित राखले. भारताने 20 षटकात 5 बाद 140 धावा करत झुंज दिली. स्मृती मानधनाने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिचा घोषने 47 धावा करत सामना जिंकण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या 47 धावांच्या खेळात 4 चौकार आणि 2 षटकार मारले.
इंग्लंडचे 152 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दमदार सुरूवात केली. सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी 3 षटकात 27 धावा चोपल्या. यात स्मृतीच्या 18 धावांचे मोठे योगदान होते.
मात्र या दमदार सुरूवातीनंतर इंग्लंडने भारताला पहिला धक्का दिला. कॅथरिन ब्रंटने सलामीवीर शफाली वर्माला 8 धावांवर बाद केले. यानंतर स्मृती मानधनाने पॉवर प्लेमध्ये दमदार फलंदाजी करत भारताला 40 धावांपर्यंत पोहचवले. यात स्मृतीचा वाटा हा 25 धावांचा होता.
जेमिमाह रॉड्रिग्जने 13 धावा करून स्मृतीची साथ सोडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर देखील 4 धावा करून बाद झाली. यानंतर स्मृतीने रिचा घोषच्या साथीने भारताला शंभरी पार करून दिली. दरम्यान, स्मृतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण करताच स्मृती बाद झाली.
भारताला आता विजयासाठी 18 चेंडूत 43 धावांची गरज होती. रिचा घोष आणि दिप्ती शर्माने सामना 12 षटकात 34 धावा असा आणला मात्र दिप्ती शर्मा 7 धावा करून बाद झाली. यानंतर सामना 6 चेंडूत 31 धावा असा आला होता.
रिचाने पहिल्या दोन चेंडूवर सलग दोन चौकार मारले. यानंतर रिचाने चौथ्या चेंडूवर षटकार मारला. मात्र शेवटी सामना 1 चेंडू 12 धावा असा आला. अखेर भारत 11 धावांनी हरला. भारताला 20 षटकात 5 बाद 140 धावांपर्यंतच मजल मारता आली.
तत्पूर्वी, महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये आज भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला 20 षटकात 7 बाद 151 धावांपर्यंत रोखले. भारताकडून वेगावान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरने भेदक मारा करत 15 धावात 5 बळी टिपले. इंग्लंडकडून नॅट सिवर ब्रंटने 50 तर एमी जोनेसने 27 चेंडूत 40 धावा केल्या.
हेही वाचा : ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच