नदालविरुद्ध फेडरर पुन्हा 'मास्टर' 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

या स्पर्धेत मी चमकदार खेळ केला. मी काही छान विजय मिळविले. टूरवरील आशियाई टप्प्यात झालेला माझा खेळ आनंददायक आहे. बीजिंग आणि शांघाय येथील स्पर्धा सकारात्मक ठरल्या. उत्तम प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मी अनेक चुरशीचे गुण जिंकलो आणि विजय मिळविले. वैयक्तिक खेळाच्या दर्जाविषयी मी फार समाधानी आहे. 
- फेडरर

शांघाय : स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने स्पेनच्या रॅफेल नदालला दोन सेटमध्ये हरवत शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. यामुळे मोसमाअखेरच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळविण्याची संधी फेडररने मिळविली आहे. 

पावसामुळे स्टेडियमचे छप्पर लावून घेण्यात आले. सध्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या फेडररने अव्वल दर्जाचा खेळ केला. त्याने पहिल्याच गेममध्ये ब्रेक मिळविला. 36 वर्षांच्या फेडररच्या दमदार प्रारंभाला प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. नदालने अनेक वेळा ताकदवान फटके मारले; पण फेडररचे परतीचे फटके परिणामकारक होते. सहाव्या गेममध्ये दोन जोरदार बिनतोड सर्व्हिस करीत त्याने 4-2 अशी आघाडी वाढविली. पहिल्या सेटमध्ये त्याने सर्व्हिसवरील 83 टक्के गुण जिंकले. 

दुसऱ्या सेटमध्ये त्याने पाचव्या गेममध्ये ब्रेक मिळविला. त्याच्या अप्रतिम व्हॉलीसमोर नदालचा फोरहॅंडचा फटका चुकला. एक तास 11 मिनिटे चाललेल्या लढतीत फेडररने सरस डावपेचांची यशस्वी अंमलबजावणी केली. त्याने सातव्या बिनतोड सर्व्हिसवर विजय साकार केला. 

दृष्टिक्षेपात 
- फेडररचे कारकिर्दीतील 94वे विजेतेपद 
- इव्हान लेंडल यांच्याशी बरोबरी 
- सर्वाधिक 109 विजेतेपदांचा उच्चांक जिमी कॉनर्स यांचा 
- नदालच्या खात्यात 75 विजेतीपदे 
- फेडररचे मोसमातील सहावे विजेतेपद 
- सहा स्पर्धा जिंकलेल्या नदालला गाठले 
- नदाल फेडरर यांच्यातील 38वी लढत 
- फेडरर 15व्या वेळी विजयी, नदालच्या खात्यात सर्वाधिक 23 विजय 
- 2014च्या ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरीत नदालची सरशी 
- तेव्हापासून नदालला फेडररविरुद्ध जिंकता आलेले नाही 
- फेडररचा सलग पाचवा विजय 
- यंदा चारही लढतींत फेडरर सरस 
- यापूर्वी नदालने त्याला सलग पाचवेळा हरविण्याची कामगिरी तीन वेळा केली आहे 
- अव्वल स्थान पुन्हा मिळविल्यापासून नदालचा पहिलाच पराभव 
- 16 विजयांची यशोमालिका खंडित 

निकाल 
रॉजर फेडरर विवि रॅफेल नदाल 
6-4, 6-3 

माझ्यासाठी हा सामना फार कठीण ठरला. रॉजरने फार वेगवान आणि चांगला खेळ केला. मी बऱ्याच वेळा फटके चुकलो. मी काही गोष्टी सरस करू शकलो असतो, पण तो फारच चांगला खेळला. त्यामुळे त्याचे अभिनंदन. 
- नदाल 

या स्पर्धेत मी चमकदार खेळ केला. मी काही छान विजय मिळविले. टूरवरील आशियाई टप्प्यात झालेला माझा खेळ आनंददायक आहे. बीजिंग आणि शांघाय येथील स्पर्धा सकारात्मक ठरल्या. उत्तम प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मी अनेक चुरशीचे गुण जिंकलो आणि विजय मिळविले. वैयक्तिक खेळाच्या दर्जाविषयी मी फार समाधानी आहे. 
- फेडरर

Web Title: Roger Federer high in Shanghai