35 वर्षीय फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत!

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नदालविरोधात खेळणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. मी बहुधा त्याच्या खेळाचा सर्वोच्च चाहता आहे...

मेलबर्न - "ऑस्ट्रेलियन ओपन' स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये आज (गुरुवार) एकूण तीन तास पाच मिनिटे चाललेल्या सामन्यात 35 वर्षीय रॉजर फेडररने देशबंधु स्टॅनिस्लास वावरिंका याला पराजित करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पाच सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात फेडररने वावरिंकास 7-5,6-3,1-6,4-6,6-3 असे पराभूत केले.

ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा फेडरर हा दुसरा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला आहे. याआधी, केन रूसवेल्ट या 39 वर्षीय टेनिसपटूने 1974 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले होते.

फेडरर याने तब्बल सहा महिन्यांच्या दुखापतीच्या काळानंतर पुनरागमन केले आहे. येणारा अंतिम सामना हा फेडरर याचा 28 वा "ग्रॅंड स्लॅम' अंतिम सामना असणार आहे. फेडरर याने याआधी चार वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. त्याने कारकिर्दीत एकूण 17 ग्रॅंड स्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत.

स्पॅनिश टेनिसपटू रॅफेल नदाल यानेही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. नदाल यानेही अंतिम फेरीत प्रवेश मिळविल्यास पुन्हा एकदा फेडरर-नदाल अशी "ड्रीम मॅच' होण्याची शक्‍यता आहे!

या विजयामुळे अत्यंत आनंद झाल्याची प्रतिक्रिया फेडरर याने व्यक्त केली. फेडरर याला यावेळी नदाल याच्याविरोधात अंतिम सामना खेळण्यासंदर्भातही विचारणा करण्यात आली. ""नदालविरोधात खेळणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. मी बहुधा त्याच्या खेळाचा सर्वोच्च चाहता आहे. नदाल व माझ्यासाठी ही स्पर्धा याआधीच अत्यंत विशेष ठरली आहे,'' असे फेडरर याने या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले.

Web Title: Roger Federer reaches Australian Open final