धावा केल्या 761, विजय मिळवला 754 धावांनी

मीत मयेकर आणि आलोक पाल
मीत मयेकर आणि आलोक पाल

मुंबई : क्रिकेटमध्ये कोणी स्वप्नातही अपेक्षित धरलेले नसते तेच घडते. याचाच अनुभव हॅरिस ढाल क्रिकेट स्पर्धेतील बोरिवलीचे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल आणि अंधेरीचे चिल्ड्रेन वेलफेअर यांच्यातील लढतीत आला. मीत मयेकरच्या तडाखेबाज त्रिशतकामुळे बोरिवलीच्या शाळेने 4 बाद 761 धावांचा हिमालय उभारल्याची चर्चा संपण्यापूर्वीच चिल्ड्रेन वेलफेअरचा डाव 6 षटकांत 7 धावांत संपला होता. अर्थातच दोन संघातील फरक झाला होता तब्बल 754 धावांचा. अर्थातच हा एकदिवसीय क्रिकेमधील विश्‍वविक्रमी विजयच आहे.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 290 धावांनी विजय न्यूझीलंडने मिळवला आहे. त्यांनी ही कामगिरी आयर्लंडविरुद्ध करताना 402 धावा केल्या होत्या. त्यापेक्षा कमालीचा मोठा फरक या सामन्यात दिसला. मीत मयेकरने 134 चेंडूत 56 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी केली. त्याला कृष्णा पारतेच्या 95 धावांची साथ लाभली आणि बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनलने 45 षटकांत 4 बाद 761 धावांचा हिमालय उभारला. हा धावांचा गड सर करणे प्रतिस्पर्ध्यांना अशक्‍य असल्याचीच जाणीव सर्वांनाच होती, पण आलोक पाल आणि वरद वझेने जणू मीत मयकेरचे फलंदाजीतील वर्चस्व झाकोळणारी कामगिरी केली. मध्यमगती गोलंदाज आलोकने तीन धावात सहा फलंदाज बाद केले, तर वरदने तीन धावात दोघांना. त्यामुळे चिल्ड्रेन वेलफेअरचा डाव सात धावातच संपला.

या सामन्यात किती विक्रम घडले हे मलाच सांगता येणार नाही. आता हेच पहा, आम्ही सात धावात डाव संपवला, पण त्यांच्या एकाही फलंदाजास भोपळा फोडता आला नाही. त्यांच्या सात धावा झाल्या त्या एक धाव बायची होती, तर सहा धावा वाईडच्या होत्या. आम्ही एवढा झटपट विजय कधीच अपेक्षित केला नव्हता; असे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे मार्गदर्शक दिनेश लाड यांनी सांगितले. हा आझादवरील न्यू एरा मैदानावर झालेला सामना संपवून आमचे खेळाडू दुपारी 2 पर्यंत घरीही पोहोचले होते, असेही त्यांनी सांगितले.
------------
हा एवढा मोठा विजय स्वप्नातही मिळेल असे वाटले नव्हते. आम्ही ही लढत सहज जिंकणार याची खात्री होती, पण सामना एवढा एकतर्फी होईल, याची कधीही अपेक्षा केली नव्हती. हा एक प्रकारचा आमच्यासाठी धक्काच होता.
- दिनेश लाड, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे मार्गदर्शक


हैदराबादमधील शालेय विक्रम मोडीत
हैदराबादमधील शालेय स्पर्धेत 2006 मध्ये सेंट पीटर्स हायस्कूलने सेंट फिलिप्स हायस्कूलला 700 धावांनी पराजित केले होते. त्यावेळी सेंट पीटर्सने 721 धावा केल्यावर सेंट फिलीपचा डाव 21 धावात संपवला होता. हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या आंतर शालेय स्पर्धेतील हा सामना 40 षटकांचा होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सेंट पीटर्सचा हा 700 धावांचा विजय आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता, असे आंतरराष्ट्रीय सांख्यिकीतज्ज्ञ मोहनदास मेमन यांनी सांगितले. त्यांनी या सामन्यातच मनोज कुमार - मोहम्मद शायबाजने 721 धावांची नाबाद विक्रमी सलामी देताना सचिन तेंडुलकर - विनोद कांबळीचा नाबाद 664 धावांचा विक्रम मोडला होता, याची आठवण करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com