रशियावरील टीकाकारही आता कौतुक सोहळ्यात 

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या रशिया संघाची हुर्यो उडवणारी यू ट्युबवरील क्‍लीप देशात चांगलीच लोकप्रिय झाली होती; पण यजमानांनी सलामीला सौदी अरेबियाचा 5-0 असा धुव्वा उडवल्यानंतर रशियात संघाबद्दलचा अभिमान उंचावला आहे.

मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या रशिया संघाची हुर्यो उडवणारी यू ट्युबवरील क्‍लीप देशात चांगलीच लोकप्रिय झाली होती; पण यजमानांनी सलामीला सौदी अरेबियाचा 5-0 असा धुव्वा उडवल्यानंतर रशियात संघाबद्दलचा अभिमान उंचावला आहे. 

रशिया विश्‍वकरंडकातील सर्वांत खालच्या क्रमांकाचा संघ आहे. आठ महिन्यांत त्यांनी एकही लढत जिंकली नव्हती. विश्‍वकरंडक स्पर्धेत ते 2002 मध्ये ट्युनिशियावर मिळविलेल्या विजयानंतर एकही सामना जिंकू शकले नव्हते. त्यामुळे त्यांची हुर्योच उडवली जात होती. या संदर्भात संघाची हुर्यो उडवणाऱ्या यू ट्युबवरील गाण्यास स्पर्धेपूर्वीच्या तीन दिवसांत जवळपास 80 लाख हिटस्‌ लाभल्या होत्या; मात्र सलामीच्या विजयाने चित्र बदलले आहे. 

गुरुवार संध्याकाळपर्यंत रशियाच्या कामगिरीची हुर्यो उडवणारे न्यूजरीडरही संघावर कौतुकाची स्तुतिसुमने उधळत होते. प्रत्येक जण आपण कशी आनंदाची बातमी तुम्हाला पहिल्यांदा देत आहोत, असेच जणू सांगत होता. आपल्या संघावर विश्‍वास नव्हता ना, हे घ्या 5-0 विजय अशा अर्थाचे शीर्षक क्रेमलिन कोमसोमलस्काया प्रावदाने दिले आहे. विश्‍वकरंडकाने रशियातील चाहत्यांचा जल्लोष 2012 नंतर प्रथमच अनुभवला होता. 

त्यांना दंड करा 
रशियाने सौदी अरेबियास पार आडवे केले, अशा अर्थाचे शीर्षक सरकारी मालकीच्या रॉस्सिस्काया गॅझेटाने दिले आहे. या विजयाचा जल्लोष रात्रभर सुरू होता. रशिया संघास स्पर्धेपूर्वी कमी लेखलेल्या, त्यांना हिणवलेल्या प्रत्येकास 10 हजार रुबल्सचा दंड करण्याची मागणी सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्यांनी केली आहे. 

 

Web Title: Russias critics also celebrate the occasion