शास्त्रीजी, चॅपेल होऊ नका

Ravi Shastri
Ravi Shastri

मायदेशात आणि उपखंडात एकामागून एक विजय मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आपली पात्रता काय आहे, हे दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड दौऱ्यात फार जवळून पाहायला मिळाली. कागदी वाघ असे बिरूद मिरवणारे भारतीय क्रिकेटपटू प्रत्यक्षात मैदानावर कशी नांगी टाकतात याचा प्रत्यय इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत स्वीकाराव्या लागलेल्या मानहानिकारक पराभवावरून स्पष्ट झालंय. भारतीय क्रिकेटचे आतापर्यंत सर्वांत मोठे नुकसान करणारे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल यांचा पावलावर पाऊल ठेवून सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी भारतीय संघात कर्णधार सोडली तर एकाही क्रिकेटपटूची जागा निश्चित ठेवली नाही. त्याचाच परिणाम असा झालाय की संघातील आपले स्थान डळमळीत होण्याच्या भितीने खेळाडूवर अनावश्यक दडपण येते अन् त्याच्या कामगिरीवर परिणाम होतो. याच दडपणाच्या जोरावर खेळाडू आपल्या कारकिर्दीवर कधी पाणी ओततो हे त्यालाच कळत नाही. त्यामुळे आता या मालिकेनंतर शास्त्रीजी खेळाडूंची कारकिर्द संपविणारे चॅपेल होऊ नका असे म्हणण्याची वेळ आली आहे.

भारत आणि क्रिकेट याचे नाते अतूट असून, क्रिकेटच्या बाबतीत भारतीयांना सगळे कळते असे समजले जाते. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयानंतर त्यांना हे प्रेषकच डोक्यावर घेतात. तर, त्याचवेळी पराभव झाल्यानंतर त्यांना टीकेचे धनीही बनवितात. त्यामुळे भारतीयांच्या क्रिकेटच्या भावनांशी खेळणे तेवढे सोपे नाही. विराटच्या नेतृत्वाखालील संघाकडून अगदी असंच काही इंग्लंडमधील कसोटी मालिकेत झाले. हा भारतीय संघ मजबूत असून, यंदा इंग्लंडला त्यांच्या मायदेशात पराभूत करेल अशी आशा बाऴगली जात होती. पण, हे सर्व पहिल्या कसोटीतच फोल ठरले. पहिल्या कसोटीत सपशेल फलंदाजी अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या कसोटीत तर डावाने पराभव स्वीकारण्याची नामुष्की विराट आणि शास्त्रींच्या मार्गदर्शनाखालील संघावर आली. भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी कमबॅक केल्याने आशा निर्माण झाल्या होत्या. पण, चौथ्या आणि पाचव्या कसोटीतील कामगिरी पाहिली तर हा संघ फक्त कागदावर बलशाली असल्याची भावना निर्माण होते.

भारतीय संघ भारतातील फिरकी आणि चेंडूला उसळी मिळत नसलेल्या खेळपट्ट्यांवरच उत्तम खेळू शकतो. हे अशा मालिका पराभवांमुळे अधिक गडद होते. मायदेशात भल्याभल्या दिग्गज संघांना म्हणजे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड अशा संघांना पराभूत करण्याची कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने वेस्टइंडीज, श्रीलंका, बांगलादेश या संघांनाही सहज लक्ष्य केले. विराटच्या नेतृत्वाखालील हा संघ कोठेही जिंकू शकतो अशी भावना जणू काही निर्माण झाली. पण, या संघाची परदेशातील कामगिरी म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात जो काही मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला आहे, त्यावरून असेच दिसते की हा संघ फक्त मायदेशातच जिंकू शकतो. आता आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही या मर्यादा आणखी उजेडात येतील अन् कर्णधार म्हणून विराटला आणि प्रशिक्षक शास्त्रींना उत्तर देणे बंधनकारक असेल.

खेळाडूंमध्ये स्थान गमाविण्याची भिती
विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून फक्त एकवेळा हो फक्त एकवेळा सलग दुसऱ्या कसोटीत संघ कायम ठेवला आहे. यावरून त्याची धरसोड वृत्ती दिसून येते. बरं हा निर्णय घेण्यासाठी एकटा कर्णधार कारणीभूत असतो, असेही नाही. संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक यांचा मोठा वाटा यात असतो. त्यामुळे शास्त्रींचे बोट धरून चालणाऱ्या विराटच्या या वृत्तीमुळेच भारतीय क्रिकेटपटूंमध्ये अस्थिरतेची भावना निर्माण झाली आहे, हे स्पष्ट होतयं. सलामीला, मधल्या फळीत, यष्टीरक्षण आणि विशेषतः गोलंदाजीच्या बाबतीत सतत संघात बदल करण्यात आले आहेत. सलामीला मुरली विजय, शिखर धवन, के. एल. राहुल यांच्याबाबतीत सतत प्रयोग करण्यात आले. तसेच काही मधल्या फळीबाबत आणि अष्टपैलू म्हणून संघात मिरवत असलेल्या हार्दिक पंड्याची कामगिरीबद्दल न बोललेलेच बरे. महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून अनेक यष्टीरक्षकांची नावे घेतली जातात. पण, धोनी हा धोनीच होता हे सध्याच्या यष्टीरक्षकांकडे पाहून म्हणावे लागले. अजूनही संघात स्थान निर्माण करण्यासाठी झगडणाऱ्या दिनेश कार्तिकसह युवा रिषभ पंतलाही आपला ठसा उमटविण्यात अपयश आलेले आहे. या सगळ्या गोष्टीमुळे खेळाडूंवर अनावश्यक दबाव निर्माण होऊन भविष्यात संघात आपण असू की नाही याचेच दडपण वाढले आहे. त्यामुळे विराट आणि शास्त्री आगोदर खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण करून त्यांच्या भविष्याविषयी त्यांना सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. तरच हा संघ कागदाऐवजी मैदानावरही मजबूत दिसेल.

एकटा विराट किती करणार
नव्वदीच्या दशकात आणि त्यानंतरही काही वर्षे भारतीय संघ आणि क्रिकेट हे पूर्णपणे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या नावाभोवती सिमीत होते. सचिन एके सचिन हीच भारतीय संघाची ओळख होती. आता विसाव्या शतकातही भारतीय क्रिकेटची तिच अवस्था आहे अशी स्थिती आहे. विराट खेळला तरच भारतीय संघ विजय मिळवू शकतो हे जणू समीकरण बनले आहे. विराटने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा बनविल्या पण संघाला अपयशाला सामोरे जावे लागले. यावरून असे दिसते की एका खेळाडूची कामगिरी संघासाठी पुरेशी नसते, टीम परफॉर्मन्स हाही काही भाग असतो. संघ खेळला तरच संघाला विजय मिळू शकतो. विराटची एकट्याची कामगिरी तुम्हाला किती दिवस तारणार हेही यामुळे उघड होते. त्याही खेळाडूला काही मर्यादा असतात आणि तो एकटाच प्रत्येक सामन्यात खेळून तुम्हाला विजय मिळवून देऊ शकत नाही. गेल्या दोन मालिकांतील पराभवातून हेच दिसते की एकटा विराट किती करणार. 

हा बेस्ट संघ कसा
इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी गेल्या काही वर्षांतील सर्वोत्तम संघ असल्याचा दावा करणारे प्रशिक्षक शास्त्री या पराभवानंतर तोंडावर आपटले आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवामुळे गोलंदाजांची सरस कामगिरी वगळता सर्वच पातळ्यांवर भारतीय संघ अपयशी ठरल्याचे दिसत आहे. अगदी माजी क्रिकेटपटूंनीही शास्त्रींच्या या दाव्याची खिल्ली उडविली आहे. वीरेंद्र सेहवागने तर नुसते हा संघ सर्वोत्तम संघ असल्याचे बोलून चालत नाही, त्यासाठी मैदानावर कामगिरी करावी लागते अशी बोचरी टीका केली आहे. तर, माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी शास्त्रींचा हा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. सौरव गांगुलीने या दौऱ्यासाठी द वॉल राहुल द्रविडला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमण्याची शिफारस केली होती, पण शास्त्रींनी पुढे काय केले असा प्रश्न दादाकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील हा संघ बेस्ट कसा यावर प्रश्न निर्माण होतो. खेळाडूची ओळख ही त्याच्या  कामगिरीवरून होत असते. जर, ती कामगिरीच होत नसेल तर खेळाडूचा अस्त हा निश्चित आहे.

अनिल कुंबळेसारख्या दिग्गज खेळाडूला हटवून रवी शास्त्रींना प्रशिक्षक बनविण्याचा हट्ट धरणाऱ्या विराट कोहलीने लक्षात ठेवावे ग्रेग चॅपेल यांची गोष्ट. इरफान पठाणच्या कारकिर्दीची वाताहत करणाऱ्या संघ भावनेत वाद निर्माण करणाऱ्या चॅपेल यांनी भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान केले आहे. तसे पुन्हा न होऊ द्यायचे असेल तर विराट आणि शास्त्रींनी खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण करून त्यांची कामगिरी सुधारण्यावर भर दिला पाहिजे. अजून एक विशेष म्हणून अंतिम अकरामध्ये खेळाडूची निवड ही त्याच्या कामगिरीवरच करायला हवी. तेव्हाच खेळाडूही आपले सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करेल आणि हे संघासाठी फायद्याचेच असेल. 

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com