World Cup 2019 : सचिन म्हणतोय, वर्ल्ड कप पुन्हा खुणावतोय!

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मे 2019

बॉल बॉईज ते विश्‍वकरंडक विजेतेपद असा स्वप्नवत प्रवास करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वतः पाच स्पर्धांत खेळलेला आहे.

बॉल बॉईज ते विश्‍वकरंडक विजेतेपद असा स्वप्नवत प्रवास करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वतः पाच स्पर्धांत खेळलेला आहे. सर्व चढ उतार अनुभवत 2011 मध्ये अजिंक्‍यपदाचे स्वप्न साकार झाल्याचा परमोच्च क्षणही पाहिला. अर्थात आता यंदाच्या स्पर्धेचे वेध लागले आहेत विराट सेनेवर सचिनचा भरवसा आहे, म्हणूनच वर्ल्डकप पुन्हा खुणावतोय असे तो म्हणतो. बॉल बॉईज ते विजेतेपद सचिनचा अविस्मरणीय प्रवास त्याच्याच शब्दात. . . . . . 

वर्ल्डकपची मजाच और असते 

कोणत्याही खेळाडूचे देशाचे प्रतिनिधित्व करायचे स्वप्न साकारले की सर्वांत मोठी इच्छा असते वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी व्हायचे. जसे काही खेळांकरता ऑलिंपिक्‍स मोलाचे तसेच क्रिकेट आणि फुटबॉल खेळणाऱ्यांकरिता वर्ल्डकप महत्त्वाचा असतो. 1992, 1996, 1999, 2003, 2007 अशा पाच वर्ल्डकपमध्ये जिवापाड प्रयत्न करूनही अपयश आले. आणि शेवटी 2011 मध्ये विश्‍वविजेतेपदाचे स्वप्न साकारले गेले. मागे वळून बघताना याच सहा स्पर्धांत प्रवास कसा झाला हे आठवताना आनंद वाटत आहे. 

बॉल बॉईज

आमचे गुरू रमाकांत आचरेकर यांचा क्रिकेट संस्कार मैदानावर घडवायची अनोखी पद्धत होती. सरावाइतकेच आचरेकरसर सराव सामन्यांना महत्त्व द्यायचे. मला आठवतेय 1987च्या वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड सामना वानखेडे मैदानावर होणार म्हणल्यावर त्यांनी प्रकाश केळकरसरांशी बोलून आम्हा काही मुलांना बॉल बॉईज म्हणून मैदानावर पाठवायची योजना आखली. ग्रॅहम गुचने स्वीपच्या फटक्‍याने भारतीय गोलंदाजांना हैराण केले होते तो सामना मी विनोद कांबळीने वानखेडे मैदानावर बॉल बॉईज म्हणून अनुभवला. वर्ल्डकपच्या त्या भारावलेल्या वातावरणाचा आमच्या मनावर मोठा परिणाम झाला. मनात विचार पक्का झाला की भारतीय संघात प्रवेश मिळवायचा आणि वर्ल्डकप सारखी स्पर्धा मेहनत करून दणाणून सोडायची. 

सुरवातीचा अनुभव 

1989 मध्ये भारतीय संघात प्रवेश केल्यावर मला 1992 मधील वर्ल्डकप खेळायला मिळाला. 1996 च्या वर्ल्डकपमधे फलंदाज म्हणून चांगली कामगिरी मला करता आली. चांगला खेळ करत भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या त्या सामन्याच्या कडू आठवणी मनात अजून ताज्या आहेत. फलकावर छोट्या दिसणाऱ्या धावसंख्येचा पाठलाग करणे किती कठीण आहे हे दुसरी फलंदाजी करताना समजले. चांगली सुरवात होऊनही नंतर जयसूर्याच्या फिरकीने सामन्याचे पारडे श्रीलंकेकडे झुकले. पुढील वर्ल्डकप माझ्याकरता संमिश्र गेला. एकीकडे माझ्या बॅटमधून धावा बरसल्या, तर दुसरीकडे त्याच स्पर्धे दरम्यान माझे वडील देवाघरी गेल्याने दु:खाचे आभाळ कोसळले. 

खरा आनंद पुढच्या वर्ल्डकपला मिळाला. 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा वर्ल्डकपचे यजमान पद लाभले होते. भारतीय संघाची सुरवात अत्यंत खराब झाली. झिंबांब्वे विरुद्धचा सामना आम्ही चांगले क्रिकेट खेळून जिंकला आणि आम्हांला लय सापडली. नंतर मोठ्या संघांना आम्ही टक्कर दिली. मग पहिल्यांदा वर्ल्डकप सारख्या भव्य स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सामना खेळायचा अनुभव मिळणार होता. 1 मार्च 2003 जोहान्सबर्ग शहराच्या थोडे बाहेर असलेल्या सेंच्युरीयन मैदानावर काय वातावरण होते म्हणून सांगू. सामन्याअगोदर दोन तास प्रेक्षकांनी मैदान भरून टाकले होते. सराव करत असताना समजत होते की दोनही बाजूच्या पाठीराख्यांच्यात घोषणा युद्ध रंगले आहे. 

प्रथम फलंदाजी करताना सईद अन्वरच्या शतकाने पाकिस्तानला 273 चा धावफलक उभारता आला. वसीम अक्रम, वकार युनुस, शोएब अख्तर, शाहीद आफ्रिदी आणि अब्दुर रझ्झाक असा जबरदस्त मारा पाकिस्तानकडे असल्याने विजयाकरता 274 धावा काढणे मोठे आव्हान होते. पाकिस्तानचा आत्मविश्‍वास उंचीवर होता. योजनेत ठरले होते की मी एका बाजूने उभे राहायचे आणि दुसऱ्या बाजूने सेहवाग, सौरव, युवराजने यांनी आक्रमक पवित्रा घ्यायचा. 

मैदानात चालत जाताना सेहवाग मला म्हणाला, आज बाकी काही मला बोलू नका... फक्त मारते रहना.. मारते रहना, बस इतनाही बोलना. नेहमी सलामीला जाताना मी पहिला चेंडू खेळत नाहीत. त्या सामन्यात मात्र मी सरळ चालत जाऊन पहिला चेंडू खेळायचा विचार दाखवला. पहिल्याच षटकात वसीम अक्रमला मारलेला बॅक फूट कव्हर ड्राईव्ह मला चांगला संदेश देऊन गेला. दुसऱ्या षटकात शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर मी बॅट चालवली. मनासारखे फटके मला सहजी मारता आले. शतक झाले नाही, पण ती खेळी खास ठरली. मी बाद झाल्यावर राहुल द्रविड- युवराजने मस्त फिनिशिंग टच देत सामना जिंकला. 
अंतिम सामन्यात जरा गोंधळ झाला.

एकतर सामन्याच्या दिवशी सकाळी वॉंडरर्स मैदानावर अचानक पाऊस पडला. खेळपट्टी ओली झाल्याने संयोजक दचकले. मग त्यांनी खेळपट्टी वाळवायला बरेच उपाय केले ज्याने नाणेफेकी अगोदर खेळपट्टीचा चेहरा काहीसा वेगळाच दिसत होता. नाणेफेक जिंकणारा कप्तान तो चेहरा बघून प्रथम गोलंदाजी करणार उघड होते. सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकली आणि आम्ही गोलंदाजी करायचा निर्णय घेतला.

आमच्या संघातील सगळे जण वर्ल्डकप अंतिम सामना आयुष्यात पहिल्यांदा खेळत असल्याने अति उत्साहाच्या भरात चुका झाल्या. त्यातून रिकी पोंटींगने अफलातून खेळी सादर केली. जरा शांतपणे प्रयत्न केला असता तर कदाचित मोठ्या धावसंख्येचा पाठलागही जमू शकला असता. पण सगळे चुकत गेले. अंतिम टप्प्यावर पोचूनही विश्‍व विजेतेपदाचे स्वप्न दूर राहिले. 

अत्यंत खराब काळ 

जॉन राईटच्या मार्गदर्शनाखाली 2003 -2004 हा काळ भारतीय संघाकरता फारच सुंदर गेला. बरोबर त्याच्या उलट 2005 ते 2007 हा काळ गेला. ज्याला कारण ठरले ग्रेग चॅपल. चॅपल यांनी पहिल्यांदा संघातील ज्येष्ठ खेळाडूंना उगाचच अस्थिर करायचा चंग बांधला. अगदी थोडक्‍यात सांगायचे झाले तर वर्ल्डकपला संघ जाताना वातावरण सकारात्मक नव्हते. ग्रेग चॅपलने मला सलामी ऐवजी चौथ्या क्रमांकावर पाठवायचा हट्ट धरला.

मनातून मला ती योजना पटली नव्हती तरी संघाचा विचार करून त्याला कडाडून विरोध केला नाही. पहिल्या सामन्यात बांगलादेश समोर आमचा नको त्या वेळी खेळ खराब झाला तेव्हाच खराब काळाची नांदी झाली. दडपण वाढत गेले आणि श्रीलंकन संघानेही आम्हांला पराभूत केले. मोठी स्वप्न मनात घेऊन वेस्ट इंडीजला गेलो होतो. साखळी फेरीतच गारद झाल्याने निराश मनाने भारतात परतावे लागले आणि अपेक्षाभंग झाल्याने मोठ्या जनक्षोभाला सामोरे जावे लागले. 

बदलाचा काळ

ग्रेग चॅपल नावाचे बालंट भारतीय संघापासून दूर गेले आणि चांगले बदल व्हायला लागले. ज्या वर्षी म्हणजे 2007 ला वर्ल्डकप पराभवाचे दु:ख पचवावे लागले त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात कोणाच्या ध्यानीमनी नसताना भारतीय संघाने पहिला टी-20 वर्ल्डकप जिंकून सुखद धक्का दिला.

2008च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गॅरी कर्स्टनने भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. कर्स्टन बरोबर क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ पॅडी ऑप्टन मार्गदर्शनाकरता आला. दोघांनी खेळाडूंचा विश्‍वास संपादन केला, प्रगतीचा मार्ग भारतीय संघाकरता खुला झाला. 

2011 वर्ल्डकपचा प्रवास

कर्मधर्म संयोगाने 2011 वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा पहिला सामना बांगलादेश बरोबरच होता. पहिल्या सामन्याअगोदर उगाचच 2007 वर्ल्डकप मधील बांगलादेश समोरच्या पराभवाचे भूत वाकुल्या दाखवत होते. मला खात्री होती की तो पराभव नव्हता, तर एक अपघात होता. भारतीय संघ बांगलादेश संघाला पुरून उरेल याची मला शंभर टक्के खात्री होती म्हणून मी एकदम विश्‍वासात होतो. झाले असे की पहिल्या सामन्याअगोदर गॅरी कर्स्टनने संघाची बैठक बोलावली.

बराच वेळ बांगलादेश संघासमोर कसे खेळायचे याची चर्चा आणि योजनांचा विचार चालू होता. सेहवागला त्यात काहीच रस वाटत नव्हता. साहजिकच त्याचे चर्चेत लक्ष नव्हते. गॅरीला ते दिसल्यावर तो नाराज झाला. सडेतोड बोलणारा सेहवाग म्हणाला की इतकी चर्चा करण्याएव्हढा तो प्रतिस्पर्धी तगडा नाहीये. त्याने नुसती बडबड केली नाही, तर पहिल्या सामन्यात बांगलादेश गोलंदाजांवर पहिल्या चेंडूपासून तो तुटून पडला. भलेमोठे शतक ठोकले. भारताने तो सामना मोठ्या फरकाने जिंकला. सुरवात चांगली झाली.

चांगल्या खेळाची लय भारतीय संघाने पकडून ठेवली. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या महत्त्वाच्या सामन्यात माझ्या धावाही झाल्या. उपांत्य सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून अंतिम सामन्याकरता आम्ही मुंबईत पोचलो. 

2003 वर्ल्डकप अंतिम सामन्यात केलेल्या चुका कशा टाळायच्या हे खेळाडूंना माहीत होते कारण अनुभव पाठीशी होता. 2011 वर्ल्डकप अंतिम सामना भारतीय संघाने कसा जिंकला हे सगळ्यांना तोंडपाठ आहे, पण त्याचा एक गंमतीदार किस्सा सांगतो. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आमची सुरवात खराब झाली. मी आणि सेहवाग लवकर बाद झालो. गौतम गंभीर आणि विराट कोहली दरम्यान रंग भरू लागलेली भागीदारी विराट बाद झाल्याने तुटली.

दडपण वाढले. नेमका त्या वेळी सेहवाग गॅलरीतील खुर्चीवरून आत ड्रेसिंग रूम मध्ये आला. आत मी अस्वस्थ मन:स्थितीत आत येरझाऱ्या घालत होतो. सेहवाग मला कंपनी द्यायला आत थांबला. धोनी आणि गंभीरची भागीदारी मैदानात जमू लागली. मग मी वीरूला जाऊन दिले नाही, कारण भागीदारी चालू असताना जागा बदलायच्या नाहीत असा क्रिकेटमधला जणू अलिखित नियम आहे. 

किट बॅग, देवाचे फोटो आणि प्रार्थना

माझ्या किटबॅगमधे देवाचे फोटो आहेत त्याकडे बघून ते प्रार्थना करत होतो आणि आम्ही फक्त अधून मधून टीव्हीवर सामन्यात काय चालू आहे हे बघत होतो. भागीदारी सुरू असताना सामना बाहेर जाऊन बघणे तर सोडाच आम्ही दोघे टॉयलेटलाही गेलो नाही. गंभीर बाद झाल्यावरही तेच सुरू ठेवणे हा माझा आग्रह होता. धोनीने षटकार मारून भारताला विजयी केल्यावर प्रेक्षकांनी जल्लोष केला मग मी बाहेर पळालो. विश्‍व विजेतेपदाचे स्वप्न साकारल्याने आम्ही सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 

पुन्हा जादू होऊ शकते

2019 वर्ल्डकप साठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघावर नजर टाकली तर वाटते की परत जादू घडू शकते. एक रिषभ पंतच्या संघात नसण्याचा अपवाद वगळला तर मला वाटते भारतीय संघाची निवड एकदम चांगली झाली आहे. वर्ल्डकप खेळायला जाण्याअगोदर त्या संघाने एकत्र भरपूर सामने खेळलेले असायला पाहिजेत. विराट कोहलीच्या या संघाने गेली तीन वर्षे सामने खेळले आहेत. सगळ्या खेळाडूंना एकमेकांच्या गुणदोषांची जाणीव आहे. 

इंग्लंडमधील वेगळेपण

2019 वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या कामगिरीचे भवितव्य मुख्यत्वे तीन गोष्टींवर अवलंबून आहे. संघातील प्रमुख फलंदाजांचा फॉर्म चांगला बहरत गेला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे वेगवान गोलंदाजांचा फिटनेस संपूर्ण स्पर्धेत कायम असायला हवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे केदार जाधव, हार्दिक पंड्या या दोन अष्टपैलू खेळाडूंनी चांगल्या गोलंदाजीबरोबर संघाला गरज असताना धावा करण्याची धमक दाखवली पाहिजे. 

अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो तो म्हणजे इंग्लंडमधील वर्ल्डकप जास्त सामने खेळायच्या दृष्टीने थकवणारा असेल, पण प्रवासाच्या दृष्टीने सुखकारक असेल. इंग्लंडमधे एका गावाहून दुसऱ्या गावी जाताना विमान प्रवासाची गरज नसते. दोन शहरातील अंतर कमी असल्याने बसने गप्पा मारत सिनेमा बघत आरामात प्रवास केला जातो ज्याने थकवा कमी येतो. 

गेले काही वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर असे दिसते की, एका आड एक स्पर्धेत भारतीय संघाने कमाल करून दाखवली आहे. 1996 मध्ये भारताने उत्तम खेळ केला. 2000 सालचा वर्ल्डकपमधे अपेक्षित खेळ करता आला नाही. 2003 वर्ल्डकपमध्ये मस्त क्रिकेट खेळत अंतिम फेरीत धडक मारली, तर 2007 मधे भयानक निराशेला सामोरे जावे लागले. 2011 मध्ये सगळेच जमून आले. विश्‍वचषकावर दुसऱ्यांदा नांव कोरता आले. 2015 मध्ये उपांत्य फेरी गाठली तरी खरी चमक दाखवता आली नाही. म्हणजेच आत्ताच्या स्पर्धेत भारतीय संघाने काही तरी खास करून दाखवायची वेळ आली आहे. 
अर्थातच आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा संघाच्या पाठीशी आहेत. 

(शब्दांकन : सुनंदन लेले)

वर्ल्ड कप संदर्भातील सर्व बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar shares his World Cup Journey