दोन्ही गेम जिंकू शकले असते, पण...!

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

साईना खूपच आक्रमक खेळाडू असल्याने शक्‍यतो स्मॅश टाळण्याचा माझा प्रयत्न होता. तिच्याविरुद्ध बचावात्मक खेळ केल्याचा फायदा होतो. सुरवातीस माझ्याकडून चुका झाल्या, त्याचा फायदा घेत तिने आघाडी घेतली. त्यामुळे मला खेळात काहीसा बदल करावा लागला. 
- सुंग जी ह्यून 

मुंबई : दोनही गेम जिंकण्याची संधी होती; पण दोन्ही गेममध्ये जादा गुणांवर चूक झाली, असे साईना नेहवालने सांगितले. साईनाच्या पराभवामुळे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील भारताच्या जेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या. 

बर्मिंगहॅमला सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधू जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या केई झु यिंग हिच्याविरुद्ध हरली; तर त्यानंतर काही वेळातच साईनाला सुंग जी ह्यूनविरुद्ध 20-22, 20-22 अशा पराभवास सामोरे जावे लागले. दुसऱ्या गेममध्ये साईनाने 16-19 पिछाडीनंतर 20-20 बरोबरी साधली होती. या वेळी तिचे ड्रॉप; तसेच स्मॅश प्रभावी होते; मात्र त्यानंतर एकदा बॅकहॅंड स्मॅश परतवण्यात फुलराणी अपयशी ठरली, तर तिचा रिटर्न नेटमध्ये रोखला गेला. ह्यून मोक्‍याच्या वेळी चांगलीच खेळली; पण माफक चूक झाली नसती, तर वेगळे चित्र दिसले असते, असे साईनाने सांगितले. 

पहिल्या गेममध्ये 17-12 आघाडी घेताना तिचे अचूक ड्रॉप्स प्रभावी ठरत होते. तिने बेसलाइनवरूनही प्रभावी खेळ केला होता. मात्र त्यानंतर तिची लय हरपली. मार्गदर्शक विमल कुमार सतत तिला शटल कोर्टच्या मध्यात ठेवण्याची सूचना करीत होते. त्यातच तिचा शटलचा अंदाज चुकण्यास सुरवात झाली. त्यामुळे तिला पाच मिनिटे एकही गुण जिंकता आला नव्हता. ह्यूनच्या चुकीमुळेच साईनाला प्रतिकाराची संधी मिळाली होती; मात्र या गेममध्येही साईनाला अखेरच्या क्षणी खेळ उंचावता आला नाही.

Web Title: Saina Nehwal Badminton All England Badminton