सिंधूचा पराभव करत साईनाची सुवर्ण कामगिरी

वृत्तसंस्था
रविवार, 15 एप्रिल 2018

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला बॅडमिंटनपटूंनी प्रथमच सुवर्ण पदक मिळविले आहे. साईनाने यापूर्वी दिल्लीत 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.  

गोल्ड कोस्ट : बॅडमिंटनमधील भारतीयांची मक्‍तेदारी राष्ट्रकुल स्पर्धेत आज (रविवार) अखेरच्या दिवशी कायम राहिली. कारण महिलांच्या एकेरीत पी. व्ही. सिंधू विरुद्ध साईना नेहवाल, असा सुवर्णपदकासाठी सामना रंगला आणि या सामन्यात साईनाने सिंधूचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर, सिंधूला रौप्य पदक मिळाले. 
 
आज या दोघींमध्ये झालेल्या अंतिम लढतीत साईनाने सिंधूवर पूर्णपणे वर्चस्व मिळवीत सिंधूचा 21-18, 23-21 असा पराभव केला. गुडघा दुखापतीमुळे सांघिक गटातून माघार घेणाऱ्या सिंधूने उपांत्य सामन्यात गतविजेत्या मिशेली ली हिचा अवघ्या 26 व्या मिनिटांत 21-18, 21-8 असा धुव्वा उडवला होता. तर माजी नंबर वन साईनाला क्रिस्ती गिलमोरचे आव्हान मोडून काढण्यासाठी 68 मिनिटे झुंझावे लागले, अखेर तिने 21-14, 18-21, 21-17 असा विजय मिळवला होता. 

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला बॅडमिंटनपटूंनी प्रथमच सुवर्ण पदक मिळविले आहे. साईनाने यापूर्वी दिल्लीत 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.  

Web Title: Saina Nehwal beats PV Sindhu to win second CWG singles gold