जागतिक क्रमवारीत साक्षी पाचव्या स्थानावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती साक्षी मलिक आणि आशियातील अव्वल क्रमांकाचा मल्ल संदीप तोमर यांनी जागतिक कुस्ती क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळवले आहे. साक्षी पाचव्या, तर संदीप सातव्या स्थानी आहे. साक्षीने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत 58 किलो गटात ब्रॉंझपदक जिंकले होते. संदीपला पुरुष विभागात 57 किलो गटात सातवे स्थान आहे. 13 महिलांसह एकूण 24 आंतरराष्ट्रीय फ्रीस्टाइल मल्ल पहिल्या दहा खेळाडूंत आहेत.

ऑलिंपिक आणि युरोपियन विजेता जॉर्जियाचा व्लादिमीर खिंचेगाशेविली (58 किलो), रशियाचा विश्‍वविजेता मगोमेद कुर्बानिलेव (70 किलो) आणि कॅनडाची ऑलिंपिक विजेती एरिका वेब (महिला 57 किलो) आपापल्या गटात अव्वल स्थानी आहेत.

साक्षी आणि संदीप यांनी आपापल्या गटात चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना हे मानांकन मिळाले आहे; मात्र हे स्थान टिकवण्यासाठी त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी सांगितले. दरम्यान, लग्नामुळे साक्षी आशियाई स्पर्धेत सहभागी झाली नाही, तर संदीप पुढील स्पर्धेसाठी कसून मेहनत घेत आहे. आमचे पुढील लक्ष ज्युनियर खेळाडूंवर आहे. मानांकन क्रमवारीत चांगले स्थान मिळण्याची त्यांच्यामध्येही क्षमता आहे, असे ब्रिजभूषण यांनी सांगितले.

Web Title: sakshi ranked fifth in the world