sandeep patil
sandeep patil

संदीप पाटील यांचे वक्तव्य नीतिमत्तेला सोडून

नवी दिल्ली - सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीसंदर्भात निवड समितीचे अध्यक्ष असतानाच्या कार्यकाळात झालेल्या गोपनीय तपशिलांचा संदीप पाटील यांनी केलेला गौप्यस्फोट नीतिमत्ता सोडून आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली. या संदर्भात योग्य व्यक्ती लवकरच पाटील यांच्याशी चर्चा करतील, असेही त्यांनी सांगितले. यावरून पाटील यांची कानउघाडणी होणार असल्याचेच संकेत मिळाले.

कार्यकाळ संपुष्टात येऊन २४ तास उलटायच्या आत पाटील यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात सचिन आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यासह इतर काही घडामोडींचे बारीकसारीक तपशील उघड केले होते. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नसती तर त्याला वगळले असते, तसेच २०१५च्या विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी महेंद्रसिंह धोनीला वन-डे कर्णधार म्हणून हटविण्याचा विचार होता, असाही गौप्यस्फोट पाटील यांनी केला होता. त्याबद्दल ठाकूर यांनी टीका केली. ठाकूर यांनी सांगितले, ‘‘मावळते अध्यक्ष या नात्याने पाटील यांनी अशी विधाने करायला नको होती हे मी सुरवातीलाच स्पष्ट करू इच्छितो. ते अध्यक्ष होते तेव्हा याच प्रश्‍नांना त्यांनी वेगळी उत्तरे दिली होती. आता कार्यकाळ संपल्यानंतर मात्र ती बदलली आहेत. ते नैतिकतेला धरून नाही. आपल्या कार्यकक्षेतील विषयांबाबत अशी अनावश्‍यक विधाने कुणी करू नयेत. याचे कारण म्हणजे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर विश्‍वास ठेवला जातो. दुसरा मुद्दा म्हणजे ते पुरेसे क्रिकेट खेळले आहेत. त्यांच्यावर इतर चार सदस्य होते. त्यांनी काहीच वक्तव्य केले नाही.’’

आचारसंहिता भंग केल्याबद्दल पाटील यांच्यावर ‘बीसीसीआय’ कारवाई करण्याच्या विचारात आहे का, यावर ठाकूर यांनी सांगितले, की योग्य व्यक्ती लवकरच पाटील यांच्याशी बोलतील.

पुजाराचाही उल्लेख

पाटील यांनी या कार्यक्रमात चेतेश्‍वर पुजारा याचाही उल्लेख केला होता. त्याने ‘स्ट्राईक रेट’मध्ये सुधारणा करावी म्हणून प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांनी त्याच्याशी चर्चा केली होती. पुजाराला अलीकडेच झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यात झगडावे लागले होते.

पाटील यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मंडळाने एमएसके प्रसाद यांची नियुक्ती केली. त्यांच्यासह पाच सदस्य मिळून केवळ १३ कसोटी आणि ३१ वन-डे खेळले आहेत. या निवडीचे ठाकूर यांनी समर्थन केले. त्यांनी सांगितले की, मंडळाने प्रथमच अर्ज मागविले होते. आम्ही अर्ज केलेल्यांनाच नियुक्त करू शकतो.’

मंडळाच्या कारभारात नको इतका हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे मंडळासाठी काम करण्यापासून लोक परावृत्त होत आहेत, असेही ठाकूर यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com