राष्ट्रीय खो-खोमध्ये मुलांत गुजरात, तमिळनाडूची सलामी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

आष्टा - येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात आयोजित ६३ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्‌घाटन उत्साहात झाले. प्रथम सत्रात १२ संघात साखळी व बाद पद्धतीने चुरशीने सामने रंगले.

आष्टा - येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात आयोजित ६३ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्‌घाटन उत्साहात झाले. प्रथम सत्रात १२ संघात साखळी व बाद पद्धतीने चुरशीने सामने रंगले. मुलांच्या गटात गुजरात, उत्तरप्रदेश, तमिळनाडू यांनी विजय मिळवले. मुलींच्या संघात गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश, ओरिसा यांना विजयश्री मिळाली. २७ राज्यांतून ५४ संघ सहभागी झाले आहेत.

क्रीडांगणाचे पूजन संत ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. राजेंद्र डांगे यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर विभागाचे उपसंचालक जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमुले, स्पर्धा निरीक्षक सुरेंद्रसिंग गुर्जर  (आग्रा), कार्यकारी संचालक आर. ए. कनाई, प्राचार्य सुभाष पाटील, सुनील शिणगारे उपस्थित होते. साखळी व बाद पद्धतीत मुलांच्या गटात गुजरात विरुद्ध मध्यप्रदेश यांच्यात चुरशीने झालेल्या सामन्यात गुजरातने एक डाव दोन गुणांनी विजय मिळवला. उत्तरप्रदेश विरुद्ध हिमाचलप्रदेश या सामन्यान उत्तरप्रदेशने २०-०६ गुणांनी विजय मिळवला.

नवोदय विद्यालय समिती विरुद्ध चंदीगढ या सामन्यात नवोदय विद्यालय समितीने १ डाव ३  गुणांनी, तर विद्याभारती विरुद्ध उत्तराखंड यात विद्याभारतीने १८-११ गुणांनी विजय मिळवला. पश्‍चिम बंगाल विरुद्ध तमिळनाडू यात तमिळनाडू विजयी झाले. ओडिसा विरुद्ध दादरा नगर हवेली या सामन्यात ओडिसा संघाने १३ गुण व १ डावाने विजय मिळवला.

मुलींच्या गटात गुजरात विरुद्ध उत्तर प्रदेश या लढतीत गुजरातने, दिल्ली विरुद्ध विद्याभारती या सामन्यात दिल्ली, हिमाचल प्रदेश विरुद्ध उत्तराखंड यात उत्तराखंड, ओरिसा विरुद्ध चंदीगढ यात ओरिसा, नवोदय विद्यालय समिती विरुद्ध दादरानगर हवेली या सामन्यात नवोदय विद्यालय समिती या संघांनी विजय नोंदवला. ४० पंच चार क्रीडांगणावर काम पहात होते. राज्य क्रीडा व्यवस्थापक प्रशांत पवार, यशवंत चव्हाण, प्रशासकीय अधिकारी शंकर स्वामी, दीपक अडसूळ, सुरेश पाटील, रमेश पाटील, संदीप  लवटे, रघुनाथ बोते, मोहित पाटील उपस्थित होते.

Web Title: Sangli News National Kho-Kho Competition