संग्रामचा ‘फॅमिली वर्कआउट’चा फंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पिंपरी - ‘मिस्टर युनिव्हर्स’ आणि ‘मिस्टर वर्ल्ड’ किताब विजेत्या संग्राम चौगुले याने ‘फॅमिली वर्कआउट’ची संकल्पना राबविण्यास सुरवात केली असून, संग्राम स्वतःबरोबरच पत्नी आणि दोन मुलांसमवेत ‘वर्कआउट’ करत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच संग्राम याने केवळ स्वतःलाच नव्हे, तर सर्व कुटुंबालाच सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘फॅमिली वर्कआउट’चा संदेश दिला आहे. 

पिंपरी - ‘मिस्टर युनिव्हर्स’ आणि ‘मिस्टर वर्ल्ड’ किताब विजेत्या संग्राम चौगुले याने ‘फॅमिली वर्कआउट’ची संकल्पना राबविण्यास सुरवात केली असून, संग्राम स्वतःबरोबरच पत्नी आणि दोन मुलांसमवेत ‘वर्कआउट’ करत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच संग्राम याने केवळ स्वतःलाच नव्हे, तर सर्व कुटुंबालाच सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘फॅमिली वर्कआउट’चा संदेश दिला आहे. 

मागील दशकभरामध्ये संग्राम याने शरीरसौष्ठव क्षेत्रामधील ‘पुणे श्री’पासून ‘महाराष्ट्र श्री’, ‘भारत श्री’,‘आशिया श्री’,‘मि. वर्ल्ड’ आणि ‘मि. युनिव्हर्स’ यांसारखे सर्व किताब पटकावले. शरीरसौष्ठव क्षेत्र आणि तरुण वर्गासाठी संग्राम ‘आयकॉन’ बनला आहे. मात्र, त्याने वर्षभरापासून स्वतःबरोबरच संपूर्ण कुटुंबालाच तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘वर्कआउट विथ फॅमिली’ची संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे.

संग्राम म्हणाला, ‘‘कुटुंबातील प्रत्येकाने तंदुरुस्ती राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी माझी इच्छा होती. सुरवातीला त्यामध्ये पत्नी स्नेहल, अकरावर्षीय मुलगा शौर्य आणि चार वर्षांची मुलगी श्रिया यांना स्वारस्य नव्हते. मात्र, सर्वांना मी ‘वर्कआउट’साठी प्रोत्साहित केले. तेव्हापासून म्हणजे साधारणतः वर्षभरापासून आम्ही चौघेही एकत्र ‘वर्कआउट’ करत आहोत. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर बरेच काही अवलंबून असते.

प्रत्येक कुटुंबातील महिला तंदुरुस्त राहिल्यास कुटुंबही आरोग्यसंपन्न होते. त्यामुळे आईने तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. लहान मुलेही आई-वडिलांचे अनुकरण करतात. माझ्यामुळे आता आम्ही चौघेही ‘वर्कआउट’करत आहोत.’’

संग्रामच्या पत्नी स्नेहल या फॅशन डिझायनर आहेत. वर्षभरापासून त्यांनी ‘फिटनेस’वर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई येथील राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये त्यांनी ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. याखेरीज खानदेश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला-क्रीडा मंचातर्फे, चिंचवडगाव येथे आयोजित सौंदर्य स्पर्धेत पश्‍चिम महाराष्ट्र विभागामध्ये त्यांनी प्रथम स्थान पटकावले आहे.

शौर्य, श्रिया यांचेही ‘वर्कआउट’
शौर्य आणि श्रिया हे दोघेही लहान आहेत. मात्र त्यांनी ‘वेट फ्री वर्कआउट’ला सुरवात केली आहे. चिमुकली श्रिया पप्पा संग्रामसमवेत ‘पुश अप्स’देखील मारते. शौर्य, श्रिया हे दोघेही ‘बॉल रोलिंग’, ‘कार्डिओ’, झुंबा यासारखे व्यायामप्रकार करतात.

Web Title: Sangram Chaugule Family Workout