सानियाने विजेतेपद कमावले; पण अव्वल स्थान गमावले

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

सानिया 13 एप्रिल 2015 पासून अव्वल स्थानावर होती. तिने 92 आठवडे हा क्रमांक राखला. यात 31 आठवडे ती मार्टिना हिंगीसच्या साथीत संयुक्त अव्वल होती.

ब्रिस्बेन : भारताची महिला दुहेरीतील अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासाठी नव्या मोसमातील पहिली स्पर्धा परस्परविरोधी भावनेची ठरली. तिने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमेरिकेच्या बेथानी मॅट्टेक-सॅंड्‌स हिच्या साथीत विजेतेपद मिळविले; पण या यशामुळे बेथानीने जागतिक क्रमवारीत सानियाला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळविला. बेथानी आधी पाचवी होती.

सानिया 13 एप्रिल 2015 पासून अव्वल स्थानावर होती. तिने 92 आठवडे हा क्रमांक राखला. यात 31 आठवडे ती मार्टिना हिंगीसच्या साथीत संयुक्त अव्वल होती. गेल्या वर्षी तिने हिंगीसच्या साथीत ब्रिस्बेन, सिडनी आणि ऑस्ट्रेलियन ओपन या तीन स्पर्धा जिंकल्या होत्या.

सानियाने या संदर्भात खिलाडूवृत्तीने प्रतिक्रिया दिली. "मला जणू काही मिस वर्ल्ड किताबाचा मुकुट तिला बहाल केल्यासारखे वाटते. आमची जोडी बरीच जुनी आहे. यापूर्वी आम्ही एकत्र खेळलो तेव्हा सिडनीत जिंकलो. आता ब्रिस्बेनमध्ये आम्ही करंडक जिंकला. आम्ही कदाचित जास्त एकत्र खेळायला हवे,' असे तिने सांगितले.

Web Title: sania wins brisbane, but looses top ranking