तुंगच्या संजना बागडीला ‘खेलो इंडिया’त कास्यपदक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

तुंग - येथील संजना बागडी हिने बालेवाडी येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीत कास्यपदक मिळवले. ६५ किलो वजन गटात तिने हरियाणाच्या प्रतिस्पर्धी मल्लावर विजय मिळवत कास्य पदकावर नाव कोरले. वेटलिफ्टिंगबरोबर (सुवर्ण) जिल्ह्याला कुस्तीत दुसरे (कास्यपदक) पदक मिळाले.

संजनाने पात्रता फेरीत पंजाबच्या महिलेला चितपट करत पुढील फेरीत प्रवेश केला. मात्र हरियाणाच्या रितिकाकडून तिला पराभूत व्हावे लागले. तिची प्रतिस्पर्धी रितिका अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे संजनाला लारी रीपॅचेस नियमानुसार कास्यपदकासाठीच्या लढतीसाठी निमंत्रण देण्यात आले. या संधीचे सोने करीत तिने हरियाणाच्या महिला कुस्तीगीराला चितपट केले आणि कास्यपदकावर नाव कोरले.

हिंदकेसरी मारुती माने ज्या तालमीत सराव करीत होते त्या कवठेपिरान येथील हिंदकेसरी तालमीत महादेव कार्वेकर, उदय खंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजना सराव करीत आहे.
कवठेपिरानचे माजी सरपंच भीमराव माने, वडील खंडू बागडी, कुस्ती मल्लविद्याचे गणेश मानुगडे यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. त्यांनी तिचा तालमीत सत्कारही केला. 

मासेमारी करून कुस्तीचा खुराक
संजना बागडी ही तुंग (ता.मिरज) येथील अतिशय गरीब घरातील महिला कुस्तीगीर असून, त्यांच्या वडिलांनी मासेमारीचा व्यवसाय करून तिला पैलवान बनवलेले आहे. घरच्या गरीब परिस्थितीला न जुमानता मिळेल त्या खुराकावर संजनाने आजवर अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांत आपले नाव चमकवले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjan Bagadi wins Bronze Medal in Khelo India