esakal | सोशल मीडियावरचीच 'वेगवान' धाव
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Gharpure writes about fast runner usain bolt and Srinivas Gowda

माहिती काही क्षणांत जगभरात जाते. हा जमाना फास्ट फूडचा आहे. यश, प्रगतीही झटपट हवी असते. आता भारतीयांना त्यापेक्षाही ऑलिंपिक, जागतिक पदकविजेते झटपट हवे असतात. नेमेचि येतो मग पावसाळाच्या धर्तीवर आपण नको त्या गोष्टीत वाहवत जातो. यापूर्वीही वाहवत गेलो, त्या वेळी काय घडले हे लक्षात घेण्याची तयारी नसते. ही सोशल अतिवेगवान धाव यश देत नाही, केवळ अपेक्षांचा मोठा बुडबुडा निर्माण करते, तेच गेले काही दिवस घडत आहे.

सोशल मीडियावरचीच 'वेगवान' धाव

sakal_logo
By
संजय घारपुरे

समाजमाध्यमांवर चर्चा होण्यासाठी, आपली पोस्ट व्हायरल होण्याच्या ध्यासातून, तसेच त्यावर सर्वांत वेगवान प्रतिक्रिया देण्याच्या हव्यासातून खूप काही घडते. हेच भारताने अनुभवले. भारताला गवसला बोल्टपेक्षा वेगवान धावपटू... कोणतीही गुणवत्ता वाया जायला नको... या धावपटूची चाचणी होणार... या सर्व घडामोडींमध्ये गुणवत्तेचा शोध ही एक प्रक्रिया आहे याचाच विसर पडतो. मग तो फुगा फुटतो. त्यामुळे काय होते, तर त्याचाही धडा मिळतो. आता श्रीनिवासा गौडा याने बोल्टपेक्षा शंभर मीटर शर्यतीत सरस वेळ दिल्याचे जाहीर झाल्यावर समाजमाध्यमांवर कौतुकाच्या लाटा उसळल्या. आता हा जो कोणी गौडा आहे, तो टोक्‍यो ऑलिंपिक स्पर्धेतील सर्वांत वेगवान धावपटू होणार, जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकणार, फक्त त्याला योग्य पाठिंबा हवा, असे सांगण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास असलेले शशी धरूर यांच्यासारखे नेते, नामवंत उद्योगपतीही त्यात सहभागी झाले. मग काय केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी त्याची चाचणी घेण्याचे ठरवले. श्रीनिवासा गौडाने त्याला नम्रपणे नकार दिला. मग काय फुगा फुटला.

बरं हे घडल्यावर काही दिवसांतच श्रीनिवासा गौडाने कम्बाला शर्यतीत नोंदवलेला विक्रम निशांत शेट्टीने मोडल्याचे सांगण्यात आले. त्या शर्यतीतील अन्य दोघांनीही बोल्टच्या तोडीची वेळ दिल्याचा दावा करण्यात आला, पण त्यांना काही चाचणीसाठी बोलावल्याचे जाहीर झाले नाही. देशात गुणवान ऍथलीट अनेक आहेत. त्यांचा शोध घ्यायला हवा. ज्यांची कामगिरी लक्षवेधक असेल, त्यांना निवडून घडवायला हवे, या श्रीनिवासा गौडाच्या वक्तव्यानंतर केलेल्या वक्तव्याचा सर्वांना विसर पडला, की श्रीनिवासा गौडाच्या कामगिरीस आपण उगाचंच महत्त्व दिले हे लक्षात आले.

ऑलिंपिक आणि तफावत
कम्बाला शर्यतीतील धावकाच्या विश्‍वविक्रमी कामगिरीचा डंका पिटला जात असताना एकच जमेची बाब होती, ती म्हणजे श्रीनिवासा गौडाला असलेली आपल्या क्षमतेची खरी जाणीव. कम्बाला शर्यतीत धावताना टाचेवर भर दिला जातो; तर शंभर मीटर किंवा ट्रॅकवरील अन्य शर्यतींमध्ये धावताना बोटांवर जोर असतो. या कम्बाला शर्यतीतील स्पर्धकाची वेळ ठरवण्यात म्हशी-रेड्यांचा वेग निर्णायक कामगिरी बजावतो. मी कम्बाला शर्यतीसाठीच चांगला आहे, श्रीनिवासाच्या या वक्तव्याने भारतास बोल्ट गवसल्याची समाजमाध्यमांपुरती असलेली चर्चा भारतीय ऍथलेटिक्‍स क्षेत्रात आणण्याचा झालेला प्रयत्न तिथेच थांबला.

आता दक्षिणेतील माध्यमांचा कानोसा घेतला. तेथील पत्रकारांशी चर्चा केली तर वेगळीच माहिती मिळते. अगदी समाजमाध्यमांवरील आपण कुठेच वाचले नसेल, पण मी आपल्याला देत आहे, याचप्रकारचे हे घडले. काही आठवड्यांपूर्वी श्रीनिवासा गौडाने ही तथाकथित कामगिरी केली होती, पण काही ट्विटनी याची खूपच चर्चा झाली. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू हे कदाचित काही मान्यवरांनी केलेल्या टिप्पणीने प्रभावित झाले असतील, पण ते असोत किंवा क्रीडा मंत्रालयातील पदाधिकारी असोत, त्यांनी श्रीनिवासाचे 28 वर्षे वय हे लक्षातच घेतले नाही. या वयात ऍथलीटस्‌ची कारकीर्द उतरणीस लागण्यास सुरुवात होते. आता त्यांनी पारंपरिक क्रीडा प्रकार आणि ऑलिंपिकमधील क्रीडा प्रकारातील तफावतही लक्षात घेतली नाही.

कम्बाला जॉकी
खरे तर श्रनिवासा गौडा हे काही कम्बाला शर्यतीतील नवे नाव नाही. म्हशी-रेड्यांच्या वार्षिक शर्यतीत तो आघाडीचा जॉकी आहे. हो, हाच शब्द वापरला जातो. सात वर्षांपासून तो या शर्यतीत आहे. त्याचे पारंपरिक काम हे बांधकाम मजूर आहे. त्यापासून फुरसत मिळते, त्या वेळी तो तीन म्हशींबरोबर या कम्बालाचा सराव करतो. त्यालाही आपण अचानक एका रात्रीत हिरो होऊ असे वाटले नसेल. श्रीनिवासाने 145 मीटर अंतर 13.62 सेकंदात पार केल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याला भारताचा उसेन बोल्ट अशी पदवी देण्यात आली. आता 145 मीटर 13.62 सेकंदात म्हणजेच 100 मीटर 9.55 सेकंदात. अर्थात, बोल्टपेक्षा तीन दशांश सेकंदाने कमी वेळ. समाजमाध्यमांवर लगेच कौतुक सुरू झाले. कर्नाटक सरकारने कौतुक करताना तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले.

व्हायरल सत्य
कम्बाला जॉकी तसेच ट्रॅक ऍथलीटस्‌ दोघेही कसून सराव करतात, पण यातील साम्य येथेच संपते. कम्बाला जॉकींसाठी ते धावणार असलेल्या म्हशींची माहिती त्यांना असणे आवश्‍यक असते. ते सरावाचाच भाग म्हणून त्या म्हशींना तेलाने चांगला मसाज करतात, त्यांची साफसफाई करतात, तसेच त्यांना दोऱ्या बांधण्याचे सोपे दिसणारे पण चांगले अवघड असणारे काम करावे लागते. श्रीनिवास गौडा हा 15 वर्षांपासून या शर्यतीत धावत आहे. त्याच्या शंभर शर्यती तरी झाल्या असतील. बोल्टची नऊ ऑलिंपिक सुवर्णपदके आणि श्रीनिवासा गौडाची कामगिरी यात खूपच तफावत आहे. कम्बालातील तज्ज्ञ आम्ही चांगले ऍथलीटस्‌ निवडतो, पण त्यांच्याकडे कम्बालाचे कौशल्य असल्याशिवाय त्यांची निवड करत नाही असे आवर्जून सांगतात.
खरे तर आपण ऑलिंपिक वर्षात भारतीय बोल्ट शोधत होतो, त्याच वेळी भारतीय ऍथलीटस्‌साठी ऑलिंपिक पात्रता कामगिरीचे आव्हान खूप मोठे भासत आहे. या परिस्थितीत त्यांची कामगिरी कशी उंचावेल याकडे लक्ष देण्याऐवजी समाजमाध्यमांवरील कौतुक कोणाचे कसे होत आहे हेच महत्त्व दिले जात आहे. जर हाच खेळाडू शोधण्याचा मार्ग असेल, तर देशभरात सुरू असलेले गुणवत्ता शोध मोहीम कार्यक्रमाचा फायदाच काय. समाजमाध्यमांवरील टिप्पणी, व्हिडीओ पाहून कोणाची निवड करायची ते ठरवता येईल की!

खरे तर या प्रकारचा व्हिडीओ प्रसारित झाल्यावर स्थानिक ऍथलेटिक्‍स मार्गदर्शकांनी त्याची पडताळणी करायला हवी, त्यानंतरच त्याबाबत निर्णय घेता येईल. व्हायरल झालेल्या व्हिडीओतील तथाकथित क्रीडापटूंची प्रत्येक वेळी क्रीडा प्राधिकरणात चाचणी घेणे हा उपाय होत नाही. क्रीडा प्राधिकरणास दिली जाणारी तरतूद कमी होत असताना ही चैन नक्कीच परवडणारी नाही. ही सोशल धावाधाव काही दिवस केवळ हवा करते यश देत नाही हाच धडा पुन्हा एकदा मिळाला हेच याचे फलित समजले तरी खूप झाले.

कामगिरीतील त्रुटी
- कम्बालात धावणाऱ्याचा वेग म्हशी ठरवतात, धावणारा म्हशींचा वेग ठरवत नाही.
- म्हशी, रेडे, गाय, बैल हे प्राणी माणसांपेक्षा जास्त वेगाने धावतात, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
- कम्बाला शर्यतीत कामगिरीची नोंद पारंपरिक स्टॉपवॉचच्या मदतीने.
- शर्यतीचे व्हिडीओ व्हायरल करणे हा एक मार्केटिंगचा भाग असू शकतो, हा साधा विचारही कोणी केला नाही.

अशा विक्रमाचे वेड भारतातच नाही
ऍथलेटिक्‍सच्या ट्रॅकवरील कामगिरीस आव्हान देण्यासाठी कम्बालाचाच उपयोग होतो असे नाही; तर फुटबॉलचाही होतो. हे भारतात घडलेले नाही, तर वेगवान ऍथलेटिक्‍स मिळणाऱ्या युरोपातही होते. फार मागे जाण्याचीही गरज नाही. रनिंग मॅगझिन या संकेतस्थळानुसार नॉर्वेच्या एरलिंग हॅलांड या फुटबॉल खेळाडूने 60 मीटर अंतर 6.64 सेकंदात पार केल्याची चर्चा सुरू झाली. या प्रकारातील ख्रिस्तोफर कोलमनची विश्‍वविक्रमी वेळ आहे 6.34 सेकंद. हॅलांडने केवळ तीन सेकंदच वेळ जास्त घेतली असल्याचे सांगण्यास सुरुवात झाली.

कम्बाला धावकांप्रमाणे हॅलांडला वेग वाढवण्यासाठी कोणाची मदत नव्हती. त्यामुळे त्याच्या कामगिरीस जास्त महत्त्व द्यायला हवे, पण लगेच ऍथलेटिक्‍स अभ्यासकांनी हॅलांडची धाव बघितली आहे, ती केवळ त्या जागेपासून त्याने किती वेग घेतला हे बघणारी आहे, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो त्यापूर्वीच स्टार्ट घेतलेला होता. त्याला स्टार्टिंग ब्लॉकपासून वेग वाढवण्याचे कौशल्य दाखवावे लागले नाही. यावर भर देत तेथील ऍथलेटिक्‍सप्रेमींनी तो आवाज रोखला.

गौडास जे दिले ते शेट्टीला का नाही?
- श्रीनिवासा गौडाला चाचणीसाठी ट्रेनचे तिकीट पाठवले होते, पण शेट्टीबाबत काहीच चर्चा नाही
- श्रीनिवासाचा कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडून गौरव तसेच रोख बक्षीसही जाहीर, निशांत शेट्टीच्या निमंत्रणाचे काहीच कानावर नाही
- श्रीनिवासाची चाचणी ठरली होती, पण निशांतबाबत काहीही चर्चा नाही

विसर रामेश्‍वर गुर्जर यांच्या धड्याचा
रामेश्‍वर गुर्जर आठवतात? अर्थात या फास्ट फॉरवर्ड आणि लाईक्‍सच्या जमान्यात जेवढ्या वेगाने हे गौडा, गुजर येतात, तेवढ्याच वेगाने विसर पडतो. गतवर्षी असाच एक गुर्जर यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. त्याची 100 मीटरची वेळ होती 11 सेकंद. भोपाळच्या या गुर्जर यांना लगेच चाचणीसाठी बोलावले. ते चाचणीत अखेरचे आले. आम्ही त्यांना प्रशिक्षण देणार. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सराव देऊन तयार करणार असे सांगितले होते. गुर्जर यांचे नाव राज्य स्पर्धेतही नाही.

हिमाच्या पाच सुवर्णपदकांचा फुगा
हिमा दासने युरोपातील पाच स्पर्धा जिंकल्या आहेत. ती आता ऑलिंपिकसाठी तयार आहे. हिमाला योग्य साथ द्यायला हवी. पूर्ण प्रोत्साहन द्यायला हवे असे सांगितले जात होते, पण या पाचही शर्यतीतील हीमाची वेळ तिच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळपास नव्हती. अर्थात, हिमा सुवर्णपदक जिंकत असताना तिची वेळ काय आहे या महत्त्वाच्या गोष्टीकडेच दुर्लक्ष केले जात होते.