संजीवनी जाधवची डबल हॅट्‌ट्रिक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

नागपूर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संजीवनी जाधवने कोईम्बतूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत महिलांची दहा हजार मीटर शर्यत स्पर्धा विक्रमासह जिंकून डबल हॅट्ट्रिक करण्याचा अनोखा विक्रम केला. 

नागपूर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संजीवनी जाधवने कोईम्बतूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत महिलांची दहा हजार मीटर शर्यत स्पर्धा विक्रमासह जिंकून डबल हॅट्ट्रिक करण्याचा अनोखा विक्रम केला. 

कोईम्बतूरच्या नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत संजीवनीने गुरुवारी पाच हजार मीटर स्पर्धा विक्रमासह जिंकली होती. विश्‍व विद्यापीठ स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सहावे स्थान मिळविणाऱ्या संजीवनीला शुक्रवारी झालेल्या शर्यतीतही आव्हान नव्हते. विजेंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संजीवनीने ही शर्यत ३३ मिनिटे ३३.९७ सेकंदांत जिंकून नवीन स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला. ही तिची कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ होय. तिने दोन वर्षांपूर्वी मुडबिद्री येथे केलेला ३४ मिनीट ०६.९१ सेकंदांचा स्पर्धा विक्रम मोडीत काढला. गतवर्षी पतियाळा येथे झालेल्या स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते. यापूर्वी कर्नाटक विद्यापीठ धारवाडच्या रेणुका हेडेने दहा हजार मीटर शर्यतीत २००० ते २००२ असे सलग तीन स्पर्धांत सुवर्णपदक जिंकले होते. 

या कामगिरीमुळे पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सलग तीन स्पर्धांत सुवर्णपदक जिंकण्याची डबल हॅट्ट्रिक तिने पूर्ण केली. पुरुषांत पाच हजार मीटर शर्यत जिंकणाऱ्या किसन तडवीने दहा हजार मीटर शर्यतीच्या प्राथमिक फेरीत दुसरे स्थान मिळविताना अंतिम फेरी गाठली. पंधराशे मीटर शर्यतीत हिरामन तावील व योगेश गोनल या पुणे विद्यापीठाच्या धावपटूंनीही अंतिम फेरीत प्रवेश केला. महिलांच्या उंच उडीत पुणे विद्यापीठाच्या जुईली बधेलेचे ब्राँझपदक थोडक्‍यात हुकले. तिने १.७१ मीटर अंतरावर उडी मारली.

Web Title: Sanjeevani Jadhav double hat-trick