पहिल्‍या खेलो इंडिया खो-खो स्‍पर्धेत संस्‍कृती नाशिकची गगन भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanskruti Nashik victory in the divisional Kho kho competition

पहिल्‍या खेलो इंडिया खो-खो स्‍पर्धेत संस्‍कृती नाशिकची गगन भरारी

नाशिक : जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १८ वर्षाखालील कुमार व मुली यांच्या नाशिक विभागीय खो- खो स्पर्धा झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे झालेल्‍या स्‍पर्धेतील दोन्‍ही गटात संस्‍कृती नाशिकच्‍या संघाने बाजी मारली. स्पर्धेचे उद्‌घाटन राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता दिलीप खांडवीच्या हस्ते झाले.

एकतर्फी निर्विवाद वर्चस्व केले प्रस्थापित

स्पर्धेत मुलांच्या आणि मुलींच्या गटात प्रत्‍येकी तीन संघ सहभागी झाले. नंदूरबार जिल्ह्याचे दोन्ही संघ अनुपस्थित होते. सर्व सामने हे बाद पद्धतीने झाले. मुलांच्या अंतिम सामन्यात संस्कृती नाशिकने एक डाव व तेरा गुणांनी जी. एस. फाउंडेशन अमळनेरचा पराभव केला. विजयी संघाकडून चंदू चावरे, चिंतामण चौधरी, भगवान दळवी या राष्ट्रीय खेळाडूंनी भरीव कामगिरी केली. संस्‍कृती नाशिकने विभागीय खो-खो स्पर्धेत कुमार गटाचे अजिंक्यपद पटकाविले. मुलींचा सामना संस्‍कृती नाशिक व धुळे संघात झाला. पहिल्या आक्रमणात संस्कृती नाशिकने प्रतिस्पर्धी धुळेचे तीस गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना धुळे संघाने पहिल्या डावात नाशिकचे अवघे तीन, तर दुसऱ्या डावात दोन गडी बाद केले. संस्कृती नाशिक संघाने सामना एक डाव व २५ गुणांनी जिंकला. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमकांचा पुरस्कार विजेती व संघाची कर्णधार वृषाली भोयेला कौसल्या पवार, सरिता दिवा, निशा वैजल, सोनाली पवार, मनिषा पडेर यांच्‍यासह ऋतुजा सहारे, दिक्षा शिताड, तेजल सहारे, ज्योती मेढे, विद्या मिरके, दीदी ठाकरे यांची साथ लाभली. पहिल्या नाशिक विभागीय खो- खो स्पर्धेत संस्कृती नाशिक संघाने कुमार व मुली गटात नाशिक विभागावर आपले एकतर्फी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या स्पर्धेकरिता खेळाडूंना कांतिलाल महाले, रवींद्र नाईक, विलास बैरागी, हेमंत पाटील, गौरव ढेमसे, राजेंद्र सोमवंशी यांनी तांत्रिक सहकार्य केले.

हेही वाचा: गावसकरांचा आशीर्वाद अन् अय्यरनं पदार्पणात ठोकलं शतक


विभागाचे करणार प्रतिनिधित्व

संस्कृती नाशिकचे दोन्ही संघ बालेवाडी (पुणे) येथे १४ ते १७ डिसेंबरदरम्‍यान होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय खेलो इंडिया खो- खो स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेतून हरियाना येथे पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया खो-खो स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक खो खो संघाची निवड केली जाणार आहे.

याप्रसंगी विभागीय क्रीडा उपसंचालक सुनीता पाटील, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, स्पर्धा निरीक्षक राज्य खो- खो संघटनेचे सह-सचिव जयांशू पोळ, राज्य खो- खो मार्गदर्शक गुरुदत्त चव्हाण, तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, महेश पाटील, स्पर्धा संयोजक गीता साखरे, जिल्हा सचिव उमेश आटवणे उपस्थित होते.

हेही वाचा: भारताचा ‘गोल’ धडाका

loading image
go to top