ऑलिंपियन चैनसिंगला हरवून सत्येंद्र सिंगला सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे - ऑलिंपियन चैन सिंगला मागे टाकत सत्येंद्र सिंगने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत जितू रायला अंतिम फेरीही गाठता आली नाही.

पुणे - ऑलिंपियन चैन सिंगला मागे टाकत सत्येंद्र सिंगने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत जितू रायला अंतिम फेरीही गाठता आली नाही.

ऑलिंपिकमध्ये आशास्थान असलेला जितू राय या स्पर्धेत अव्वल आठ जणांमध्ये आला नाही. हरियानाच्या अनमोल जैन याने पी. एन. प्रकाश आणि ओंकार सिंग या ऑलिंपियनना मागे टाकत बाजी मारली. अंतिम फेरीत 201.3 गुणांचा वेध घेताना अनमोलने अन्य स्पर्धकांना किमान साडेतीन गुणांनी मागे टाकले. महाराष्ट्राचा विक्रम शिंदे अंतिम फेरीत बाद झालेला पहिला स्पर्धक ठरला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवरील या स्पर्धेत प्राथमिक फेरीत चैन सिंग; तसेच सत्येंद्रने समान 1164 गुणांचा वेध घेतला; पण अचूक लक्ष्यवेध करण्यात चैन सरस होता. त्यामुळे त्याला पहिला क्रमांक देण्यात आला. अंतिम फेरीत सत्येंद्रने 450.9 गुणांचा वेध घेताना चैनला (448.4) सहज मागे टाकले. नौदलाचा राहुल पुनिया तिसरा आला.

विश्‍वकरंडक कुमार विजेत्या शुभंकर प्रामाणिकने अपेक्षेनुसार बाजी मारली. त्याने प्रोनमध्ये विश्‍वकरंडक सुवर्णपदक जिंकले होते; पण राष्ट्रीय स्पर्धेत थ्री पोझिशन प्रकारात बाजी मारली. तो प्राथमिक फेरीत दुसरा होता; पण अंतिम फेरीत 442.1 गुणांचा लक्ष्यवेध करीत अव्वल क्रमांक मिळविला. त्याने अन्य स्पर्धकांना किमान 11.8 गुणांनी मागे टाकले. शुभंकरने नागरी विभागातील कुमार गटातही बाजी मारली.

स्वप्नील कुसळेस सुवर्णपदक
दरम्यान, या स्पर्धेतील नागरी गटात रेल्वेच्या स्वप्नील कुसळेने सुवर्णपदक जिंकले. त्याने उत्तर प्रदेशच्या अखिल शेओरान याला मागे टाकले. महाराष्ट्राने 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. मात्र विक्रम शिंदे, रोनक पंडित, राजेंद्र बागूलच्या राज्य संघास (1719) जितू रायच्या लष्कर मार्कसमनशिप युनिटने (1725) मागे टाकले.

Web Title: satyendra singh gold medal