भारताच्या सौरभ वर्माचा मुख्य स्पर्धेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

सिंगापूर सिटी - भारताच्या सौरभ वर्मा याने सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले. त्याने पात्रता फेरीत दोन सामने जिंकले.

सिंगापूर सिटी - भारताच्या सौरभ वर्मा याने सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले. त्याने पात्रता फेरीत दोन सामने जिंकले.

सौरभ 24 वर्षांचा असून त्याला तिसरे मानांकन होते. गेल्या महिन्यात त्याने तैवान मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्याने पहिल्या लढतीत इस्राईलच्या मिशा झिल्बरमन याला 21-13, 23-21 असे हरविले. हा सामना 39 मिनिटे चालला. दुसऱ्या लढतीत त्याला थायलंडच्या पन्नावीत थोंगनुआम याने जोरदार झुंज दिली. एक तास आठ मिनिटे चाललेल्या लढतीत सौरभने जिद्दीने खेळ करीत 27-29, 21-18, 21-18 असा विजय संपादन केला. राष्ट्रीय विजेत्या सौरभची बुधवारी पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या अँथनी सिनीसुका गिंटींग याच्याशी सलामी आहे.

पुरुष दुहेरीत एम. आर. अर्जुन-श्‍लोक रामचंद्रन, तर मिश्र दुहेरीत सात्वकिसाईराज रंकीरेड्डी-के. मनीषा यांनीही मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले. अर्जुन-श्‍कोल यांनी मलेशियाच्या नूह महंमद अझ्रीयन अयुब-जगदीश सिंग यांना 21-19, 21-18 असे हरविले. पहिल्या फेरीत त्यांना पुढे चाल मिळाली होती. त्यांची सलामी मलेशियाच्या यूव सीन ओंग-इ यी तिओ याच्याशी असेल.

रंकीरेड्डी-मनीषा यांनी इंडोनेशियाच्या अँड्रोव युनान्तो-रोफाहादाह सुप्रियादी पुत्री यांना 21-9, 21-12 असे हरविले. दुसऱ्या लढतीत त्यांनी भारताच्याच महिमा अगरवाल-के. नंदगोपाल यांना 21-18, 14-21, 21-11 असे हरविले. त्यांच्यासमोर तैवानच्या लू चिंग याओ-चियांग काई ह्‌सीन यांचे आव्हान असेल. दुहेरीत मात्र रंकीरेड्डीला चिराग शेट्टीच्या साथीत पराभूत व्हावे लागले. इंडोनेशियाच्या हेंद्रा सैतीयावन-बून हिआँग टॅन यांच्याकडून ते हरले.

साईनाची माघार
साईना नेहवालने भरगच्च आंतरराष्ट्रीय सर्किटसाठी आणखी सराव करता यावा म्हणून या स्पर्धेतून माघार घेतली. यानंतर चीनमधील वुहान शहरात होणाऱ्या आशियाई स्पर्धेत ती भाग घेईल. साईनाला मलेशियन ओपनमध्ये पहिल्याच फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिच्याकडून पराभवाचा धक्का बसला होता. साईनाने सांगितले की, "सरावासाठी अजून वेळ द्यायला हवा असे मला वाटते. गुडघ्याची स्थिती सुधारली आहे. मी इंडोनेशियामधील सुपर सिरीज आणि सुदीरमन करंडक या स्पर्धांतही भाग घेईन.'

सिंधुची सलामी ओकुहाराशी
रिओ ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिने भाग घेतला आहे. बुधवारी तिची सलामी जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याशी होत आहे. सिंधूसाठी ड्रॉ खडतर आहे. तिला पाचवे मानांकन आहे. ओकुहाराने गेल्या वर्षी ऑल इंग्लंड विजेतेपद मिळविले होते. तिने रिओ ऑलिंपिकमध्ये ब्रॉंझ जिंकले होते. ओकुहाराने पाच सामन्यांत सिंधूला तीन वेळा हरविले आहे. सिंधूलासुद्धा कामगिरी उंचावण्याची गरज आहे. मलेशियन स्पर्धेत तिला चीनच्या युफेई चेन हिने हरविले होते.

Web Title: saurabh varma entry in main competition