World Cup 2019 : रायुडू नाही म्हणून मी नाराज आहे

सईद किरमाणी
मंगळवार, 14 मे 2019

इतर सर्व संघ वन-डे क्रिकेट खेळत असल्याचे मला दिसते आहे, तर दुसरीकडे भारतीय संघाची तयारी थंड आहे, पण मला हा मुद्दा नकारात्मक वाटत नाही, कारण खेळाडूंकडे अष्टपैलू क्षमता आहे. त्यांना सकारात्मक दृष्टिकोन व क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. 

वर्ल्ड कप 2019 : तर अशा प्रकारे आयपीएलचा प्रदीर्घ मोसम आत्ताच पार पडला. अनेक सामन्यांचे निकाल अखेरच्या चेंडूवर लागले. त्यामुळे एकूणच हा प्रवास रोमहर्षक ठरला. विश्वकरंडकासाठी निवड झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रत्यक्ष सामने खेळण्याचा पुरेसा सराव मिळाला, जो त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले. 

मी आगामी विश्वकरंडकासाठी जास्त उत्सुक आहे, कारण स्पर्धेचे इंग्लंडमध्ये पुनरागमन होत आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे 1983च्या जगज्जेतेपदाच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. त्या आठवणी आजही ताज्या आहेत. या वेळी पूर्वीच्या अनेक प्रयत्नांच्या तुलनेत आपला संघ सर्वोत्तम वाटतो. खेळाडू 50 षटकांच्या स्पर्धेपूर्वी टी-20 क्रिकेट प्रमाणाबाहेर खेळत आहेत का, अशी काळजी वाटत होती; पण स्वरूपानुसार अनुरूप बदल करण्याइतका अनुभव त्यांच्याकडे आहे. 

इतर सर्व संघ वन-डे क्रिकेट खेळत असल्याचे मला दिसते आहे, तर दुसरीकडे भारतीय संघाची तयारी थंड आहे, पण मला हा मुद्दा नकारात्मक वाटत नाही, कारण खेळाडूंकडे अष्टपैलू क्षमता आहे. त्यांना सकारात्मक दृष्टिकोन व क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. 

Image may contain: text

आयपीएलसंदर्भात नकारात्मक मुद्दा म्हणजे केदार जाधवची दुखापत. त्याला स्पर्धेला मुकावे लागले तर ते फार वाईट ठरेल. 50 षटकांच्या सामन्यांत गेली दोन वर्षे तो संघासाठी बहुमोल पर्याय ठरला आहे. तो खेळू शकला नाही तर मी अंबाती रायुडूची निवड करेन. 

भारताने मुळात रिषभ पंतची निवड करायला हवी होती की नाही, यावरून बरीच चर्चा सुरू आहे. मला वाटते की पंतला अजून बरीच मजल मारायची आहे. त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरली आहे. त्याने अनुभवाबरोबर परिपक्व बनण्याची व खूप काही शिकण्याची गरज आहे. फिनिशिंग, सर्वोत्तम कामगिरी मोक्‍याच्या क्षणासाठी राखून ठेवणे आणि जिंकणे या गोष्टी त्याने शिकायला हव्यात. अनुभवाबरोबर हे तो शिकेल. 

आता संघाविषयी बोलायचे झाले तर संतुलन चांगले असून, प्रत्येक क्षेत्रासाठी पर्याय आहेत. आयपीएलनंतर संघ थकलेला आणि तणावाखाली असेल यात शंका नाही; पण विश्वकरंडकातील सहभाग त्यांच्यात उत्साह निर्माण करेल. 

गोलंदाजी अलीकडच्या काळात सर्वाधिक संतुलित आहे. वेग, उपयुक्त फिरकी आणि मनगटाच्या जोरावर चेंडू आकर्षक पद्धतीने वळविणारे गोलंदाज असे सर्व काही आहे. 

माझ्या संघाच्या तुलनेत एकच वेगळी गोष्ट आहे. ती म्हणजे विजय शंकरऐवजी रायुडूची निवड. विश्वकरंडकात मी शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळविणार नाही. त्यासाठी मी जाधवला तो तंदुरुस्त असेल तर घेईन. तो नसल्यास रायुडू असेल. रायुडू नाही म्हणून मी नाराज असलो तरी संघात पुरेसा दर्जा आहे. काही टीकाकारांना वाटत असले तरी संघ पहिल्या तीन फलंदाजांवर अवलंबून नाही. काही खेळाडू फार दर्जेदार असून त्यांच्याकडे पुरेशी क्षमता आहे. 

भारत उपांत्य फेरी आरामात गाठेल. त्यानंतर कुणालाही संधी असेल. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंड असे संघ माझ्या मते उपांत्य फेरीत जातील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sayed Kirmani talks about World Cup 2019