शालेयस्तरावरच होते खेळाडूंची निर्मिती - कन्हैया गुर्जर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे - भविष्यातील खेळाडूंची निर्मिती ही शालेयस्तरापासूनच होते आणि हा स्तर म्हणजे खेळाडूंची खाण असल्याचे भारतीय शालेय क्रीडा महासंघाचे अधिकारी कन्हैया गुर्जर यांनी येथे सांगितले.

पुणे - भविष्यातील खेळाडूंची निर्मिती ही शालेयस्तरापासूनच होते आणि हा स्तर म्हणजे खेळाडूंची खाण असल्याचे भारतीय शालेय क्रीडा महासंघाचे अधिकारी कन्हैया गुर्जर यांनी येथे सांगितले.

म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक्‍स स्पर्धेदरम्यान त्यांची गाठ घेतली असता, त्यांनी विविध विषयांवर आपली मते स्पष्टपणे मांडली. खेळ कुठलाही असो कुमार वयात भारतीय खेळाडू अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील चमकतो; पण पुढे खुल्या स्तरावर गेल्यावर तो मागे पडतो ही सद्यःस्थिती मान्य करून गुर्जर म्हणाले, ‘‘आम्हालाही हे कोडे पडले आहे. शालेयस्तरावर खेळाडू चमकतात. आमच्या महासंघाच्या वतीने त्या दृष्टिकोनातून योग्य तो कार्यक्रम राबवला जातो. त्यांच्या प्रशिक्षणाची काळजी घेतली जाते. मात्र, जेव्हा शालेयस्तरातून खेळाडू मोकळ्या मैदानात येतो, तेव्हा मार्गदर्शनाची दिशाच बदलते. आपण सुरवातीला शिकलो ते की आता मिळत असलेले मार्गदर्शन योग्य या कचाट्यात खेळाडू अडकतो. पर्यायाने याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर होतो.’’

संघटन पातळीवर शालेय क्रीडा महासंघाच्या वाटचालीबद्दल बोलताना गुर्जर म्हणाले, ‘‘शालेय महासंघ म्हणजे खेळाडूंचा पाया आहे. आम्ही येथे त्याला तयार करतो. एक नाही अनेक खेळांवर आमची एकच संघटना काम पाहात असते. देशाला विविध खेळांतील खेळाडू येथूनच मिळतात. आमच्याकडून खेळाडू तयार झाल्यावर त्याला जपण्याची किंवा त्याला पैलू पाडण्याची जबाबदारी ही त्या खेळाच्या संघटनेची आहे. नेमके याच नियोजनावर आपण कमी पडतो. शालेय महासंघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ऑलिंपिकपदक विजेता सुशीलकुमार अध्यक्ष आहे.  संघटनपातळीवर खेळाडूंचा उपयोग करून घेतल्यास निश्‍चितच खेळ आणि खेळाला न्याय मिळू शकतो.’’

उत्तेजक सेवनांचे प्रकार वाढत आहेत. दुर्दैवाने कुमार वयातच खेळाडू त्याकडे ओढले जाऊ लागले आहेत. त्यादृष्टीने आम्ही खेळाडूंमध्ये जागृती करण्याचे काम करत आहोत. या स्पर्धेसाठीदेखील आम्ही ‘नाडा’च्या दोन अधिकाऱ्यांना आमंत्रित केले आहे. स्पर्धा उत्तेजकविरहित व्हावी, याकडे आमचा कटाक्ष नेहमीच राहिला आहे.
- कन्हैया गुर्जर, 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school lavel was the generation of players