आईच्या हातचे पालक पनीर हेच यशाचे रहस्य - पंकज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - आईच्या हातचे पालक पनीर हेच माझ्या यशाचे खरे रहस्य आहे, हे माझ्या कामगिरीचे गुपित आहे, असे सांगतानाच पंकज अडवाणीने ऑलिंपिक खेळातील यश, क्रिकेट याकडेच केवळ लक्ष न देता सर्वच खेळातील महत्त्वाच्या कामगिरीचे कौतुक करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

मुंबई - आईच्या हातचे पालक पनीर हेच माझ्या यशाचे खरे रहस्य आहे, हे माझ्या कामगिरीचे गुपित आहे, असे सांगतानाच पंकज अडवाणीने ऑलिंपिक खेळातील यश, क्रिकेट याकडेच केवळ लक्ष न देता सर्वच खेळातील महत्त्वाच्या कामगिरीचे कौतुक करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

पंकजने जागतिक विजेतेपद जिंकले किंवा कोणत्याही स्पर्धेत यश मिळवले, की त्याची आई त्याला पालक पनीरची खास डिश करून देते. याकडे लक्ष वेधल्यावर पंकजने हसत हसत, "हे माझ्या यशाचे गुपित आहे. ते मी कोणाबरोबर खरे तर शेअर करीत नाही. पनीर तसेच पालक यातून भरपूर प्रोटिन्स मिळते, घरचे असल्यामुळे ते जास्त आवडते. त्यातूनच नजीकच्या लोकांकडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असते,' असेही सांगितले. 

सोळा जागतिक विजेतेपदे जिंकल्यानंतरही आपल्या कामगिरीची योग्य प्रकारे दखल घेतली जात नाही, हे पंकजला सलत आहे. तो म्हणाला, क्रिकेट हा खेळ आपल्या देशात कमालीचा लोकप्रिय आहेच. आता ऑलिंपिक यशाचेही कौतुक होत आहे. ऑलिंपिकच्या निमित्ताने आता काही महिने अन्य खेळाकडे लक्ष जात आहे; पण साडेतीन वर्षे खेळाच्या प्रगती, खेळाडूंच्या कौतुकाबाबत कोणीच काही बोलत नाही. या कालावधीत मिळवल्या जाणाऱ्या जागतिक विजेतेपदाकडेही चाहत्यांचे दुर्लक्ष होते, हे बदलण्याची गरज आहे. ऑलिंपिक, आशियाई, राष्ट्रकुल याच स्पर्धेतील यश महत्त्वाचे असेल, तर त्याच स्पर्धेत खेळावे. आपल्याला वर्षानुवर्षे जागतिक स्तरावर हुकूमत राखणारे खेळाडू हवे आहेत. 

यशाचे मोजमाप, कोणत्या खेळात यश आहे, त्यावरून करणे चुकीचे आहे. आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये होते, आता त्यास ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांतील यश जोडले गेले आहे. खेळात समानता असते. आता प्रत्येक खेळातील कामगिरीचे सारखेच कौतुक करायला हवे, असेच माझे मत आहे. आता संघटनांनी हे करायलाच हवे; पण चाहत्यांनीही याकडे लक्ष द्यायला हवे, असे पंकजने सांगितले. 

क्‍यू स्पोर्टस लीगची गरज 
स्नूकर, बिलियर्डस्‌बाबत उत्सुकता वाढत आहे. चाहत्यांना याची माहिती हवी आहे. आता हा खेळ जास्तीत जास्त लोकप्रिय करण्यासाठी टीव्हीवर येण्याची गरज आहे. त्याचबरोबर हा खेळ खेळणे कसे सोपे होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. या खेळातील लीगची चर्चा सुरू आहे. ती प्रत्यक्षात येण्याची गरज आहे. आता खेळ लोकप्रिय करण्यासाठी ही लीग सुरू करण्याची गरज आहे; मात्र ही जबाबदारी खेळाच्या महासंघाची आहे. आता पूर्वीपेक्षा जास्त संधी आहेत. स्पर्धा वाढल्या आहेत. 

Web Title: The secret of success is the mother's hands Palak Paneer