प्रतिस्पर्ध्यास फसविण्याचा डाव कार्लसनवर उलटला

वृत्तसंस्था
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

न्यूयॉर्क - बुद्धिबळाच्या लढतीत धोका पत्करण्याचीही मर्यादा असते, नेमकी हीच बाब जगज्जेता मॅग्नस कार्लसन विसरला. त्याचा पुरेपूर फायदा घेत सर्गी कर्जाकीनने जागतिक बुद्धिबळ विजेतेपदाच्या लढतीतील बरोबरीची कोंडी फोडली. परिणामी कार्लसन या लढतीत प्रथमच मागे पडला. अर्थात, बुद्धिबळ तज्ज्ञ अजूनही काहीही घडू शकते, असा इशारा देत आहेत.

न्यूयॉर्क - बुद्धिबळाच्या लढतीत धोका पत्करण्याचीही मर्यादा असते, नेमकी हीच बाब जगज्जेता मॅग्नस कार्लसन विसरला. त्याचा पुरेपूर फायदा घेत सर्गी कर्जाकीनने जागतिक बुद्धिबळ विजेतेपदाच्या लढतीतील बरोबरीची कोंडी फोडली. परिणामी कार्लसन या लढतीत प्रथमच मागे पडला. अर्थात, बुद्धिबळ तज्ज्ञ अजूनही काहीही घडू शकते, असा इशारा देत आहेत.

बारा डावांची ही लढत खूपच कंटाळवाणी होत असल्यामुळे कार्लसनने त्यात खूपच नाट्य आणण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्याने कर्जाकीनला आक्रमणासाठी चिथावणी दिली. ११ लाख डॉलर बक्षीस रकमेच्या या लढतीतील आठवा डाव कर्जाकीन जिंकला. त्याच्या यशाबरोबरच कार्लसनच्या चुकांची, तसेच पत्रकार परिषदेस उपस्थित न राहिल्यामुळे १० टक्के दंडास सामोरे जाणाऱ्या कार्लसनचीही तेवढीच चर्चा झाली.
आठव्या डावातील सुरवातीच्या चाली अपेक्षेनुसारच सुरू होत्या. मात्र, आठव्या चालीत कार्लसनने प्याद्याची अदलाबदली करीत पहिला धक्का दिला. या डावात जे काही घडले, त्या मानाने हा धक्का सौम्यच होता. विसाव्या चालीपर्यंत डाव बरोबरीत सुटणार, असेच वाटत होते. त्यानंतरच्या काही चालींत कार्लसनने अचानक वेगाने मोहरामोहरी केली. त्यातच मोहऱ्याच्या मदतीने प्यादे जिंकण्याऐवजी प्याद्याचा वापर करीत धोका पत्करला. तज्ज्ञ यातून सावरण्यापूर्वीच कार्लसन धक्के देत होता. त्याने त्याचे मोहरे खूपच सक्रिय केले. त्यामुळे ते खूपच विस्कळित झाली होती. त्यातच कार्लसनने दोन प्यादी गमावत जणू आता बरोबरी नाही, असेच स्पष्ट करण्यास सुरवात केली होती. 
कार्लसनच्या या पवित्र्याने कर्जाकीन अस्वस्थ झाला होता. त्याला खेळाची वेळेशी सांगड घालणे जमत नव्हते. कार्लसनने विजयाचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी कर्जाकीनच्या राजाचे संरक्षण करणारे प्यादे जिंकले. कर्जाकीनचे इ पट्ट्यातील प्यादे कार्लसनला पूर्ण वर्चस्वापासून वंचित ठेवत होते. मात्र, कार्लसन सातत्याने शह देऊन कर्जाकीनला चूक करण्यास भाग पाडेल, असेच वाटत होते. 

चिवट कर्जाकीन हार मानत नसल्यामुळे कार्लसनने बहुधा संयम गमावला. त्याने ४९ व्या चालीत प्याद्याचा मोबदला देण्याऐवजी वजिराची खेळी करीत कर्जाकीनला प्रतिआक्रमणाची चांगली संधी दिली. कर्जाकीनची भक्कम व्यूहरचना, तसेच योग्य ठिकाणी मोहरे ठेवल्यामुळे कार्लसनची कोंडी होत गेली. अखेर त्याने ५६ चालींनंतर हार मान्य केली.

कार्लसनला दहा टक्के दंड
डावानंतरच्या पत्रकार परिषदेस उपस्थित न राहिल्याबद्दल कार्लसनला दहा टक्के दंड होईल. खरं तर पत्रकार परिषदेसाठी कार्लसन आला होता. मात्र, त्या वेळी मुलाखत सुरू असल्यामुळे कर्जाकीन लगेच आला नाही. काही मिनिटेच प्रतीक्षा केल्यानंतर कार्लसन निघून गेला. कार्लसनला पराभव सहन झाला नाही, अशी टिप्पणी कर्जाकीनच्या व्यवस्थापकांनी केली. लढतीच्या नियमावलीनुसार पत्रकार परिषदेस उपस्थित न राहिल्यास दहा टक्के दंड होतो.

Web Title: sergey karjakin vs magnus carlsen