Shahid Afridi World Cup 2023 : ... तर बीसीसीआयच्या चेहऱ्यावर थप्पड लगावल्यासारखं होईल; आफ्रिदी बरळला | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Cup 2023 Shahid Afridi

Shahid Afridi World Cup 2023 : ... तर बीसीसीआयच्या चेहऱ्यावर थप्पड लगावल्यासारखं होईल; आफ्रिदी बरळला

World Cup 2023 Shahid Afridi : जागतिक क्रिकेटमध्ये सध्या भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात शाब्दिक वार पलटवार सुरू आहेत. आशिया कपच्या व्हेन्यूवरून पेटलेले हे शाब्दिक युद्ध आता काही महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपपर्यंत पोहचले आहे. भारताने आशिया कपसाठी आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे. तर पाकिस्तानने भारतातील वनडे वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची भाषा केली आहे. आता या प्रकरणात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपले नाक खुपसले आहे.

पाकिस्तानने भारतीय संघ आशिया कप खेळण्यासाठी भारतात येणार नाही म्हटल्यावर एक हायब्रीड प्रस्ताव ठेवला होता. मात्र भारताने त्यालाही नाक मुरडलं. यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पीसीबी चेअरमन नजम सेठींच्या वाचाळपणावर नाराजी व्यक्त केली आहे. आफ्रिदी म्हणाला की पाकिस्तानने भारता होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये सहभागी व्हावे आणि वर्ल्डकप जिंकून परत यावे. ही बाब भारतीय क्रिकेट बोर्डाच्या चेहऱ्यावर थप्पड बसल्यासारखी असेल.

शाहिद आफ्रिदी पाकिस्तानी टीव्ही चायनल समा टीव्हीवर बोलताना म्हणाला की, 'नजम सेठींना ही गोष्ट समजली पाहिजे की पीसीबी चेअरमनच्या पदाचे महत्व काय आहे, त्यांची जबाबदारी काय आहे. त्यांना आपली वक्तव्ये सारखी सारखी बदलण्यापासून दूर राहिलं पाहिजे. त्यांनी आशिया कपच्या आयोजनाबाबत प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत फिरण्याची गरज नाही.

भारतात जावून वर्ल्डकप जिंकला पाहिजे

आफ्रिदी पुढे म्हणाला की, पीसीबी चेअरमनचे मत स्पष्ट असलं पाहिजे. आता वनडे वर्ल्डकपसाठी आपला संघ भारतात न पाठवणे हे समजण्यापलिकडचे आहे. जर क्रिकेट खेळलं जात असेल तर आपला संघ देखील असला पाहिजे. मग ते भारतात होऊ दे नाही तर दुसरीकडे कुठेही. तुमच्या दृष्टीने तेथे जाऊन ट्रॉफी जिंकून परत येणे याशिवाय दुसरे काही मोठे असू शकत नाही. हे एक प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर थप्पड मारल्या सारखे होईल.'

(Sports Latest News)