पराभवाच्या भीतीमुळे भारत पाकिस्तानशी क्रिकेट खेळत नाही : क्रिकेट मंडळ

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

आमच्या या विजयानंतर मी भारताला आव्हान देतो.. आमच्या देशात या आणि द्विपक्षीय मालिका खेळून दाखवा! ते आमच्याशी खेळणार नाहीत.. पाकिस्तानच्या संघाची भारताला भीती वाटते..

कराची : 'चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताला आता पाकिस्तानशी खेळण्याची भीती वाटू लागली आहे' अशी दर्पोक्ती पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी केली. 'याच कारणामुळे पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका खेळण्याचे भारत टाळत आहे', असा दावाही खान यांनी केला.

गेल्या महिन्यात झालेल्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची लढत पाकिस्तानशी झाली होती. या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. हे पाकिस्तानचे चॅंपियन्स स्पर्धेतील पहिलेच विजेतेपद आहे. 'आमच्या या विजयानंतर मी भारताला आव्हान देतो.. आमच्या देशात या आणि द्विपक्षीय मालिका खेळून दाखवा! ते आमच्याशी खेळणार नाहीत.. पाकिस्तानच्या संघाची भारताला भीती वाटते..' असे शहरयार खान म्हणाले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिलेल्या मेजवानीनंतर एका पाकिस्तानी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मुक्ताफळे उधळली.

'या नेत्रदीपक विजयानंतर आता प्रत्येक संघाला पाकिस्तानबरोबर खेळायची इच्छा आहे. आता त्यांनी पाकिस्तानमध्ये यायला हवे. इथे आता कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. पाकिस्तानच्या दौऱ्यावर येण्यासाठी आम्ही श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीजच्या क्रिकेट मंडळांशी चर्चा करत आहोत. सुरवातीला ते कदाचित फक्त ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी छोटेखानी दौरा करू शकतील. चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील विजयाचा आपण फायदा घेतला पाहिजे. केवळ यावर समाधान मानून चालणार नाही', असेही शहरयार खान या मुलाखतीमध्ये म्हणाले.

2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी क्रिकेट संबंध तोडून टाकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेल्या स्पर्धावगळता भारत पाकिस्तानशी क्रिकेट खेळत नाही. 'पीसीबी' आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार, 2015 ते 2023 या कालावधीमध्ये दोन्ही देशांमध्ये सहा द्विपक्षीय मालिका होणे अपेक्षित आहे. मात्र, केंद्र सरकारने परवानगी दिली तरच या मालिका शक्‍य आहेत.

2009 मध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर लाहोर येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात श्रीलंकेच्या संघाचे सहा खेळाडू जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झाले होते. 2011 मध्ये भारतीय उपखंडात झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानमधील सामनेही देशाबाहेर हलविण्यात आले होते.

Web Title: Shahryar Khan says India are scared of Pakistan