
आयपीएलमधून धोनी स्वतःला जोखणार आहे. जर त्याच्या अंतर्मनाने सकारात्मक ऊर्जा दाखवली नाही तर धोनी तेथेच क्रिकेटला गुडबाय करू शकेल.
तो सध्या काय करतो...
सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून दूर राहतो...
प्रसिद्धी माध्यमांपासूनही लांब राहतो...
कुटुंबासोबत सर्व वेळ घालवतो...
...पण खेळायची उर्मी आणि जिद्द कायम बाळगून ठेवतो...
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
एव्हाना 'तो' म्हणजे कोण लक्षात आले असेलच. तमाम भारतीय क्रिकेटरसिकांचा माही अर्थात महेंद्रसिंग धोनी ! धोनी खेळत असो वा नसो, कोणीही त्याला भारतीय क्रिकेटपासून दूर करू शकत नाही. कारण त्याने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. किंबहुना क्रिकेट जगतात कर्णधार म्हणून धोनीने जे घवघवीत यश मिळवले आहे तसे यश कोणत्याही कर्णधाराला मिळालेले नाही.
ट्वेन्टी-20 आणि 50-50 षटकांच्या सामन्यांचे विश्वविजेतेपद त्याचवेळी कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान आणि चॅम्पियन्स करंडक असे मानाचे तुरे धोनीने आपल्या आणि पर्यायाने भारताच्या मुकुटात रोवलेले आहे. सिकंदर स्टीव वॉ आणि रिकी पॉंटिंगच्या या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 50-50 षटकांचे आणि चॅम्पियन्स विजेतेपदाबरोबर कसोटी क्रमवारीत कांगारूंना अव्वल स्थानावर नेलेले आहे, पण ट्वेन्टी-20 विश्वकरंडक त्यांना जिंकता आलेला नाही. (ही स्पर्धा सुरू होण्याअगोदरच स्टीव वॉ निवृत्त झाला होता.)
- Happy birthday Rahul Dravid : टीम इंडियाची 'दीवार'!
म्हणूनच धोनीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि त्याने ज्या ट्वेन्टी-20 चे विश्वकरंडक स्पर्धेचे विश्वविजेतेपद मिळवून दिले तीच स्पर्धा आता समोर असताना धोनी काय करणार, हा प्रश्न सध्या भारतीय क्रिकेटप्रेमींनाच नव्हे तर बीसीसीआय प्रशासनालाही पडलेला आहे. याचे उत्तर केवळ धोनीच देऊ शकतो. धोनीची कारकीर्द आता अस्ताकडे आहे हे निश्चितच. कसोटी क्रिकेटमधून त्याने कधीच निवृत्ती घेतलेली आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून सध्या ब्रेक घेतलेला असला तरी त्याने स्वतःसह त्याच्या पाठीराख्यांच्या आशा कायम ठेवलेल्या आहेत, परंतु आता तो कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत खेळेल असे वाटत नाही, खेळलाच तर आशिया करंडक आणि ट्वेन्टी-20 विश्वकरंडक ! अन्यथा धोनी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणे जवळपास अशक्यच आहे.
- रहाणेच्या ट्विटवर तेंडुलकरचं उत्तर, प्रश्न वाचाल तर तुम्हीही म्हणाल..
इंग्लंडमधील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर धोनी क्रिकेटच्या वेषात मैदानात अवतरलेलाच नाही. म्हणूनच धोनी सध्या काय करतो, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर ते कालपर्यंत विराटचा संघ अनेक सामने खेळला आहे, पण धोनीचा एकदाही विचार झालेला नाही.
आपली उपलब्धता त्याने बीसीसीआय किंवा निवड समितीला कळवलेलीही नाही. लष्करी प्रशिक्षणासाठी त्याने अघिकृत ब्रेक घेतला होता एवढेच. काही काळापर्यंत धोनी विराटसेनेचा अविभाज्य भाग होता, पण आता त्याच्याशिवाय खेळायची सर्वात महत्त्वाचे म्हणजे डीआरएसबाबता निर्णय घेण्याची सवय करून घेतली आहे.
सन्मान कायम
म्हणजे आता धोनी संघात हवाच असे नाही, असा प्रस्न कोणालाही पडू शकतो. त्यामुळेच मध्यंतरी त्याच्या निवृत्तीच्या अफवा अधूनमधून उठत होत्या. प्रसिद्धिमाध्यमे असो वा काही माजी खेळाडू असो, टीम इंडियाचा कर्णधार आणि त्यापेक्षा मुख्य व्यवस्थापक रवी शास्त्री धोनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
धोनीचे भवितव्य काय हे त्यांनाही माहीत नसेल, पण धोनीने आतापर्यंत दिलेले योगदान विराट-शास्त्री विसरू शकत नाही. एवढेच कशाला सौरव गांगुलीकडून टीम इंडियाचा दरारा आणि झेप धोनीने कायम ठेवली, त्याच धोनीबरोबर आपण चर्चा करणार असल्याचे गांगुलीने बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यानंतर सांगताना त्याचा सन्मान कायम ठेवला.
एरवी कितीही मोठा खेळाडू असो, पण एक काळ असा येतो जेव्हा एखादा संघ निवडताना निवड समिती किंवा बीसीसीआय त्या खेळाडूशी थेट बोलून त्याच्या भवितव्याबाबत बोलते आणि काही वेळानंतर त्या खेळाडूने निवृत्ती स्वीकारलेली असते. धोनीबाबत तसे काही घडलेले नाही.
- 'या' दिग्गज क्रिकेटपटूची पत्नी पडद्यावर साकारणार झूलन गोस्वामी
शास्त्रींचा गौप्यस्फोट
काल परवापर्यंत धोनीबाबत प्रश्न विचारला की चेंडू आक्रमकपणे सीमापार धाडावा अशा आक्रमकपणे प्रसिद्धिमाध्यमांना उत्तर देणाऱ्या रवी शास्त्री यांनी, ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी धोनी कदाचित काही दिवसांत एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होईल, असा गौप्यस्फोट केला.
शास्त्री वायफळ बाता मारणार नाही किंवा उगाचच पुडी सोडणार नाही. ते कधीच कोणाची पर्वा न करता मत मांडत असतात. त्यामुळे शास्त्री यांचा हा गौप्यस्फोट विचार करायला लावणारा आहे. आयपीएलनंतर धोनीचे भवितव्य निश्चित होईल, तसेच संघावर बोजा ठरू, असेही धोनी करणार नसल्याचे शास्त्री पुढे म्हणतात. त्यात अनेकार्थी तथ्य असावे.
गरज उपयुक्तता सिद्ध करण्याची
आता मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाईल, त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात आयपीएल. ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघ निवड झालेली आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी धोनीचा विचार होणे शक्यच नाही, मग राहता राहिली आयपीएल. मुळात धोनीचा स्वभाव विचारी आहे. तो विचार हटकेही असतो. आपल्याला नक्की पुढे काय करायचेय, याचा विचार त्याने नक्की केलेला असेल.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-20 स्पर्धेत खेळण्याची त्याची इच्छा आहेच. त्यासाठी सध्या संघात राहून कर्तृत्व सिद्ध करण्याची गरज नाही. प्रश्न आहे उपयुक्ततेचा. ती तो आयपीएलमधूनही दाखवू शकतो, म्हणूनच यंदाची आयपीएल कोण जिंकणार, कोण किती विक्रम करणार, यापेक्षा धोनीकडून कशी कामगिरी होणार, याची उत्सुकता असेल.
म्हणून धोनीची गरज कायम
आयपीएलमधून धोनी स्वतःला जोखणार आहे. जर त्याच्या अंतर्मनाने सकारात्मक ऊर्जा दाखवली नाही तर धोनी तेथेच क्रिकेटला गुडबाय करू शकेल. आणि तसे झाले नाही तर येणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत धोनी खेळताना दिसेल. पण त्या अगोदरच्या ट्वेन्टी-20 सामन्यात त्याला खेळावे लागेल. रिषभ पंतचे कितीही गुणगाण गायले जात असले तरी त्याच्यावर पूर्ण विश्वास तयार झालेला नाही. दुसरा चांगला पर्यायही तयार झालेला नाही. म्हणूनच धोनीची गरज कायम आहे.
खेळून निवृत्तीची संधी मिळणार?
सामना खेळून भर मैदानात निवृत्ती घेणे हा कोणत्याही खेळाडूसाठी सन्मान असतो. भारताच्या दिग्गज खेळाडूंचा विचार केला तर सचिन तेंडुलकर (केवळ कसोटी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाही), सौरव गांगुली यांना निरोपाचा सामना खेळण्याची संधी मिळाली, परंतु राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग यांना मैदानात खेळून निवृत्तीचे भाग्य मिळाले नाही. धोनीवर ही वेळ येऊ नये, पण आयपीएलमध्ये मनासारखे घडले नाही तर धोनीलाही असाच निरोप घ्यायला लागू शकेल.
धोनी महात्म्य :
- दोन विश्वविजेतेपद, एक चॅम्पियन्स करंडक.
- तीन आयपीएल विजेतेपद.
- कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला अव्वल स्थान.
- 350 एकदिवसीय, 90 कसोटी आणि 98 टी-20 सामने.
- तिन्ही प्रकारांत मिळून यष्टीमागे 829 बळी.