एकटीच जेव्हा सगळ्या धावा करते

पीटीआय
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - क्रिकेट हा सांघिक खेळ. धावा करताना प्रत्येक जण आपले योगदान देत असतो. संघाच्या धावांत कुणा एकाच खेळाडूच्या सर्व धावा असतील असे कधीही होत नाही. पण, हे घडलं. दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट सामन्यात म्पुमलंगा संघाच्या 169 धावांत शानिआ-ली स्वार्ट हिच्या एकटीचा 160 धावांचा वाटा होता.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक स्पर्धेत म्पुमलंगा आणि इस्टर्न्स यांच्यातील टी- 20 सामन्यात ही अनोखी घटना घडली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या म्पुमलंगा संघाने 20 षटकांत 8 बाद 169 धावा केल्या. यामध्ये 19 वर्षीय स्वार्ट हिने 86 चेंडूत 18 चौकार आणि 12 षटकारांसह 160 धावा फटकावल्या. संघाच्या खात्यातील उर्वरित नऊ धावा या अवांतर ठरल्या. म्हणजेच त्यांचे बाकी फलंदाज शून्यावर बाद झाले.

संघाच्या डावात 120 चेंडूंपैकी स्वार्ट एकटी 86 चेंडू खेळली. तिची निकोलेट फिरी हिच्यासह नवव्या विकेटसाठी 61 धावांची नाबाद भागीदारी झाली. यात फिरी केवळ तीन चेंडू खेळली. म्पुमलंगा संघाने हा सामना 42 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे गोलंदाजीतही चमक दाखवताना स्वार्ट हिने 21 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्येक षटकांत ती तीन तरी चौकार मारायचीच. समोरची सहकारी बिचकत खेळताना वाटली, तर ती एक धाव काढून पुढच्या षटकांत पुन्हा स्ट्राईक आपल्याकडे राखत होती. पूर्ण 20 षटके तिने असाच खेळ केला.

सर्व गुण संपन्न स्वार्ट
स्वार्ट ही दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलर्सप्रमाणेच सर्वगुण संपन्न खेळाडू आहे. डिव्हिलर्सप्रमाणेच ती बहुतेक खेळात अग्रेसर आहे. उत्तम हॉकीपटू असणाऱ्या स्वार्ट हिचा पुढील वर्षासाठी प्रिटोपिया विद्यापीठ संघातही समावेश झाला आहे. ऍथलेटिक्‍स प्रकारातील "थ्रो' इव्हेंटमध्ये ती भाला आणि गोळाफेक प्रकारातही कौशल्य पणाला लावते. वेगवान गोलंदाज म्हणून तिने क्रिकेट खेळायला सुरवात केली. पुढे फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने फिरकी गोलंदाजी करण्यास सुरवात केली.

Web Title: Shania-Lee Swart