Shardul Thakur WTC Final : ओव्हलवरचा एकच लॉर्ड! भारत अडचणीत असताना ठाकूरच देतोय मदतीचा हात | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur At Oval WTC Final

Shardul Thakur WTC Final : ओव्हलवरचा एकच लॉर्ड! भारत अडचणीत असताना ठाकूरच देतोय मदतीचा हात

Shardul Thakur At Oval WTC Final : ओव्हलवर सुरू असलेल्या WTC Final मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर भारताची अवस्था 6 बाद 152 धावा अशी झाली होती. त्यावेळी भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर क्रीजवर आला. मुंबई क्रिकेटमधील खडूसपणा ठासून भरलेल्या शार्दुल ठाकूरने दुसऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेसोबत सातव्या विकेटसाठी दमदार शतकी (109) भागीदारी रचस भारताची लाज वाचवली.

विशेष म्हणजे अजिंक्य रहाणे 89 धावांवर बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकूरने आपले अर्धशतक पूर्ण करत भारताला 300 च्या जवळ पोहचवण्याचा प्रयत्न केला. त्याने 51 धावांची खेळी मात्र ही खेळी ग्रीनने संपवली. भारताचा पहिला डाव 296 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली.

दरम्यान, शार्दुल ठाकूरचे हे अर्धशतक खास ठरले. कारण शार्दुलचे हे ओव्हलवरील तिसरे अर्धशतक ठरले. ज्यावेळी भारताची अवस्था ओव्हलवर 6 बाद 117 धावा अशी झाली होती त्यावेळी शार्दुल ठाकूरने 36 चेंडूत 57 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारत पुन्हा एकदा अडचणीत आला होता. भारताच्या 312 धावांवर 6 विकेट्स गेल्या होत्या. शार्दुल आला आणि त्याने 72 चेंडूत 60 धावा ठोकल्या. आज भारताची अवस्था 6 बाद 152 धावा अशी झाली होती त्यावेळी 109 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी करत भारताची लाज वाचवली.

अजिंक्य रहाणेच्या 89 आणि शार्दुल ठाकूरच्या 51 धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 296 धावा केल्या. रविंद्र जडेजानेही 48 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने 3 तर मिचेल स्टार्क, कॅमरून ग्रीन आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)