INDvBAN : प्रदूषणामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात भारताला अपयश; बांगलादेश पुढे 149 धावांचे आव्हान!

वृ्त्तसंस्था
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

धवन आणि राहुल जोडी टिकाव धरू शकली नाही. अमिनुल इस्लामने राहुलचा अडथळा दूर केला. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या फटकेबाजीने भारतीय डावाने काहिसा वेग घेतला. पण, श्रेयसची फटकेबाजी तेवढ्यापुरतीच ठरली.

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे चर्चेत राहिलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात बांगलादेशाने यजमान भारताला जवळपास रोखले होते. मात्र, अखेरच्या दोन षटकांत निघालेल्या धावांमुळे भारताला 148 धावांची मजल मारता आली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना बांगलादेशाच्या गोलंदाजीसमोर मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही. भारताचा डाव 6 बाद 148 असा मर्यादित राहिला. 

राजधानीत वाढणाऱ्या प्रदूषणाच्या पातळीमुळे सामना होणार की नाही ही चर्चा अखेर प्रतिस्पर्धी कर्णधार नाणेफेकीसाठी उतरल्यावर थांबली. बांगलादेशाचा कर्णधार महमुदुल्ला याने नाणेफेक जिंकताना भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात भारताने शिवम दुबे, तर बांगलादेशाने महंमद नईम यांना पदार्पणाची संधी दिली. 

भारताला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय बांगलादेशाचा वेगवान गोलंदाज सईफूल इस्लामने अचूक ठरवला. त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्माला (9) पायचित पकडले. पंचांनी बाद दिल्यावर रोहितने 'रेफरल'ची मागणी केली. पण, चेंडू मधल्या यष्टीवर जात असल्याचे स्पष्ट झाल्याने पंचांचा निर्णय कायम राहिला. सुरवातीलाच भारताने रोहितसारखा मोहरा आणि 'रेफरल' असे दोन्ही गमावले. त्यानंतर शिखर धवनने संघात पुनरागमन करताना एक बाजू लावून धरली. मात्र, त्याला मनमोकळी फटकेबाजी करता येत नव्हती आणि समोरून साथही मिळत नव्हती. 

धवन आणि राहुल जोडी टिकाव धरू शकली नाही. अमिनुल इस्लामने राहुलचा अडथळा दूर केला. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या फटकेबाजीने भारतीय डावाने काहिसा वेग घेतला. पण, श्रेयसची फटकेबाजी तेवढ्यापुरतीच ठरली. अमिनुला फटकाविण्याच्या नादात तो बाद झाला. त्याने 13 चेंडूंत 1 चौकार, 2 षटकारांसह 22 धावा केल्या. त्यानंतर अखेरच्या काही षटकात धवनने टिकणे गरजेचे असताना तो धावबाद झाला. त्याने 42 चेंडूंत 41 धावा केल्या. त्यानंतर पंतने आक्रमक खेळ करताना भारताच्या डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला मुंबईकर शिवम दुबेची साथ मिळू शकली नाही.

फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा दुबे पदार्पणाच्या लढतीत केवळ एकच धाव करू शकला. पंत आणि कृणाल पंड्या डावाला वेग देतील ही आशाही फोल ठरली. सैफुलने डावातील 19 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पंतला बाद केले. पण, त्याच्या त्या षटकांत 14 धावा घेतल्या गेल्या. अल अमिन हुसेनच्या अखेरच्या षटकांत वॉशिंग्टन सुंदर आणि कृणाल पंड्या यांनी दोन षटकांरासह 12 धावा घेतल्या. या अखेरच्या दोन षटकांतील 26 धावांमुळेच भारताचे आव्हान भक्कम होऊ शकले. 

संक्षिप्त धावफलक :

भारत 20 षटकांत 6 बाद 148 (शिखर धवन 41 -42 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, रिषभ पंत 27 -26 चेंडू, 3 चौकार, श्रेयस अय्यर 22, कृणाल पंड्या नाबाद 15, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 14 - 5 चेंडू, 2 षटकार, सैफुल इस्लाम 4-036-2, अमिनुल इस्लाम 3-0-22-2)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shikhar Dhawan and Washington Sundar Lead India To 148