World Cup 2019 : शिखर आऊट; रिषभ पंतची होणार एन्ट्री

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात निर्णायक शतकी खेळी करणारा शिखर धवन अखेर विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेला रिषभ पंत अगोदरच लंडनमध्ये दाखल झालेला आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात निर्णायक शतकी खेळी करणारा शिखर धवन अखेर विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेला रिषभ पंत अगोदरच लंडनमध्ये दाखल झालेला आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळ सजवत असताना पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता. तशा परिस्थितीतही त्याने फलंदाजी केली आणि टीम इंडियाला तिनशे पार मजल मारून दिली होती. धवनच्या बोटाचे स्कॅन करण्यात आले तेव्हा हेअर लाईन फ्रॅक्‍चर असल्याचे निदान झाले होते. 

धवनच्या या दुखापतीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत स्पर्धेच्या अंतिम टप्यापर्यंत तो तंदुरुस्त होईल अशी आशा कर्णधार विराट कोहली तसेच फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी सांगितले होते. त्यामुळे धवन संघाबरोबर होता. दरम्यान बॅकअप म्हणून रिषभ पंतला पाचारण करण्यात आले होते. 

धवनची दुखापत स्पर्धा संपेपर्यंत बरी होण्याची लक्षणे नसल्याने संघ व्यवस्थापानाने अखेर धवन उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट केले. रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात धवनऐवजी लोकेश राहुल रोहित शर्माबरोबर सलामीला आला आणि या दोघांनी शतकी सलामी दिली त्यामुळे आता राहुल स्थिरावला आहे. परिणामी संघ व्यवस्थापनाला धवनबाबत निर्णय घेणे सोपे झाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shikhar Dhawan Ruled Out Of World Cup 2019