shivchatrapati award
shivchatrapati award

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी आता ऑनलाइन अर्ज 

पुणे : राज्यातील खेळाडूंना वाट पाहण्याची सवय होऊन बसलेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी भविष्यात वाट पाहावी लागणार नाही. पुरस्कार प्रक्रियेला एका नियोजनात बांधून ते योग्य वेळी जाहीर होतील आणि त्याचे वितरणही लगेच होईल अशा पद्धतीने राज्य क्रीडा संचालनालयाने राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी नवी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार आता खेळाडूंना पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. विशेष म्हणजे गेली तीन वर्षे थकलेल्या पुरस्कारांचेही आता या नव्या नियमावलीनुसारच मूल्यांकन करण्यात येणार आहे. 

पुरस्कारांसाठी नवी नियमावली तयार करण्यात आल्यानंतर ती हरकतींसाठी शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी पुरस्कारांची अंतिम नियमावली शासनाने निश्‍चित केली. नव्या नियमावलीनुसार करण्यात आलेला महत्त्वाचा बदल म्हणजे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी आता विद्यापीठ आणि स्कूल नॅशनल स्पर्धादेखील ग्राह्य धरल्या जाणार आहेत. त्याचबरोबर जलतरण या क्रीडा प्रकारात आता जलतरण, डायव्हिंग आणि वॉटरपोलो असे स्वतंत्र पुरस्कार दिले जणार आहेत. 

ऑनलाइन आणि स्वयंसाक्षांकित 
दरवर्षी 25 ऑक्‍टोबरपर्यंत पुरस्काराबाबतची प्रसिद्धी देऊन 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात येणार आहेत. शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव, क्रीडा मार्गदर्शन, शिवछत्रपती खेळाडू, शिवछत्रपती साहसी, एकलव्य दिव्यांग खेळाडू, उत्कृष्ट संघटक, कार्यकर्ता अशा विभागांत पुरस्कार दिले जाणार असून, सर्व अर्ज हे ऑनलाइन करायचे आहेत आणि त्याची स्वयंसाक्षांकित प्रतही क्रीडा संचालनालयात सादर करायची आहे. अर्जांच्या छाननीनंतर पुरस्कार समितीने सादर केलेली पुरस्कार्थींची यादी हरकतीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार. त्यानंतर 18 फेब्रुवारीस पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आङे. शिवजयंतीला पुरस्कारा वितरण होणार आहेत. 

नशीबवान आट्यापाट्या 
पुरस्कारांसाठी 39 क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली आहे. यात आट्यापाट्या हा खेळ पुन्हा एकदा नशीबवान ठरला आहे. छत्रपती पुरस्कार वितरणाला सुरवात झाल्यापासून या खेळाला पुरस्कार चुकलेला नाही. गेल्या कित्येक वर्षांत राष्ट्रीय स्पर्धा झाल्या नसल्या, तरी या खेळाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा मिळतोच. नव्या नियमावलीची रचना करताना तरी या खेळाला वगळले जाईल, असे वाटत होते; मात्र नव्या नियमावलीतही आट्यापाट्या कायम राहिले आहे. 

मरणोत्तर पुरस्कार नाही 
जीवनगौरव पुरस्कारसाठी शासनाने दरवर्षी केवळ एकच पुरस्कार देण्याचा नियम केला आहे. त्याचबरोबर हा पुुरस्कार मरणोत्तर दिला जाणार नाही, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यकर्ता पुरस्कार आठ विभागांत (मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर) दिले जाणार आहेत. क्रीडा मार्गदर्शक आणि कार्यकर्ता पुरस्कारासाठी महिला निवड झाल्यास तो पुरस्कार "जिजामाता' पुरस्कार म्हणून ओळखला जाणार आहे. 

सर्वोच्च पुरस्कार देताना त्यावर बंधने नसावीत. पुरस्कारासाठी पात्र असणारा खेळाडू केवळ एका अटीमुळे त्यापासून वंचित राहत असेल, तर ते योग्य नाही. खुलेपणाने पुरस्कार दिले जावेत. 
- श्रीरंग इनामदार, छत्रपती आणि अर्जुन पुरस्कार विजेते खो-खो खेळाडू 

तीन वर्षांचे पुरस्कारही नव्या नियमात बसवले जाणार आहेत. नव्याने अर्ज करायला लागतील. त्रास वाढेल; पण कागदपत्रे जोडायची विसरलेल्या खेळाडूंना ती जोडण्याची संधी मिळेल. हे खूप चांगले झाले; पण हे सगळे केल्यानंतर पुरस्कार या वेळी तरी वेळेवर जाहीर व्हायला हवेत. 
-एक अर्जदार खेळाडू 

पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात आलेले खेळ 
आर्चरी, ऍथलेटिक्‍स, बॅडमिंटन, बिलियर्डस/स्नूकर, कॅरम, बुद्धिबळ, सायकलिंग, तलवारबाजी, गोल्फ, जिम्नॅस्टिक, अश्‍वारोहण, लॉन टेनिस, मल्लखांब, नेमबाजी, स्केटिंग, स्क्वॅश, जलतरण (जलतरण, डायव्हिंग, वॉटरपोलो), टेबल टेनिस, ट्रायथलॉन, आट्यापाट्या, बास्केटबॉल, शरीरसौष्ठव, बॉक्‍सिंग, क्रिकेट, फुटबॉल, हॅंडबॉल, हॉकी, ज्यूदो, कबड्डी, कयाकिंग/कॅनोइंग,खो-खो, वेटलिफ्टिंग, रोइंग, तायक्वांदो, व्हॉलिबॉल, पॉवरलिफ्टिंग, कुस्ती, वुश, यांटिंग. 

-दरवर्षी एकच जीवनगौरव पुरस्कार 
-क्रीडा मार्गदर्शक तीन पुरस्कार, महिला असल्यास "जिजामाता' पुरस्कार 
-पात्र खेळातील प्रत्येकी एक पुरुष आणि महिला खेळाडूस शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 
-जलतरणात सहा पुरस्कार (जलतरण, डायव्हिंग, वॉटरपोलो) 
-तेनसिंग नॉर्गे पुरस्कार मिळणारा साहसी क्रीडा पुरस्कारासाठी थेट पात्र 
-दरवर्षी प्रत्येकी एक पुरुष महिला खेळाडूस "एकलव्य' दिव्यांग पुरस्कार 
-उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शन, कार्यकर्ता आठ पुरस्कार (प्रत्येक विभागात एक) 
-टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळसाठी थेट पुरस्कारासाठी विशेष संधी 
-पुरस्कार यादीतून खेळ वगळण्याचा किंवा एखाद्या खेळाच्या समावेशाचा अधिकार शासनाचा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com