संजीवची अंतिम फेरी थोडक्‍यात हुकली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

विश्वकरंडक नेमबाजी अंतिम टप्प्याच्या स्पर्धेस भारतीयांकडून निराशाजनक सुरुवात झाली. पहिल्या दिवशी झालेल्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत संजीव राजपूतची अंतिम फेरी एका गुणाने हुकली. हा अपवाद सोडल्यास अन्य नेमबाज अंतिम फेरीपासून खूपच दूर राहिले.

मुंबई : विश्वकरंडक नेमबाजी अंतिम टप्प्याच्या स्पर्धेस भारतीयांकडून निराशाजनक सुरुवात झाली. पहिल्या दिवशी झालेल्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत संजीव राजपूतची अंतिम फेरी एका गुणाने हुकली. हा अपवाद सोडल्यास अन्य नेमबाज अंतिम फेरीपासून खूपच दूर राहिले.

चीनमधील या स्पर्धेत प्राथमिक फेरीत संजीवला 1153 गुणांचाच वेध घेता आला. तो नववा आला. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या आठ नेमबाजात पोलंडचा तामास्झ बार्तनिक आठवा आला. त्याने 1154 गुण मिळवले होते. संजीवने एक गुण जास्त मिळवला असता तर अंतिम फेरी त्याचीच होती. अचूकतेच्या गुणात संजीव दोनने सरस होता. संजीवने नीलिंग (384-383) आणि प्रोन (388-383) यामध्ये वर्चस्व राखले; पण तो स्टॅंडिंगमध्ये (381-388) मागे पडला.

संजीवचा सहकारी नवोदित अखिल शेरॉन तेरावा आला. त्याला 1147 गुणच नोंदवता आले. अखिलने नीलिंग (381) आणि प्रोनमध्ये (388) चांगली कामगिरी केली होती; पण तो स्टॅंडिंगमध्ये (378) खूपच मागे पडला.

महिलांच्या स्पर्धेत अंजुम मौदगिल अव्वल आठपासून दूर राहिली. तिला 1147 गुणांपर्यंतच मजल मारता आली. ती तेरावी आली. नीलिंगमध्ये 377 गुणच नोंदवल्यावर तिने प्रोन (390) आणि स्टॅंडिंगमध्ये (380) प्रगती केली; पण अंतिम फेरी गाठलेली अखेरची आठवी स्पर्धक पेई रुजिआलो हिच्यापासून अंजुम 11 गुणांनी मागे होती.

आज राही, मनूकडे लक्ष
भारताला पहिल्या दिवशी एकही पदक मिळाले नसले, तरी ही उणीव दुसऱ्या दिवशी राही सरनोबत आणि मनू भाकर 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भरून काढतील अशी आशा आहे. याचबरोबर अनिष भानवाला पुरुषांच्या रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात पदकाचा वेध घेण्यास उत्सुक असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shooter sanjeev missed final by one point