
Shubman Gill : जानेवारी गाजवणाऱ्या गिलने कॉन्वे अन् सिराजला मागे टाकत पटकावला ICC चा पुरस्कार
Shubman Gill Named ICC Mens Player of the Month : भारताचा सलामीवीर शुभमन गिलसाठी जानेवारी महिना हा स्वप्नवत गेला. त्याने या महिन्यात द्विशतकी, शतकी धमाका करत तीनही क्रिकेट प्रकारात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी प्रबळ केली. आयसीसीने देखील गिलच्या या कामगिरीची दखल घेतली असून त्याला जानेवारी महिन्याचा प्लेअर ऑफ द मन्थ हा पुरस्कार दिला.
जानेवारी महिन्यातील ICC Mens Player of the Month पुरस्कारासाठी शुभमन गिल सोबतच न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे आणि भारताचा मोहम्मद सिराज यांना देखील नामांकन मिळाले होते. या सर्वातून शुभमन गिलने बाजी मारली.
शुभमन गिलने जानेवारी महिन्यात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला होता. 50 - 60 धावांवर अडकलेली शुभमन गिलची गाडी आता मोठ्या शंभरकडे कूच करू लागली आहे. त्याने श्रीलंका आणि न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे मालिकेत चांगली फलंदाजी केली होती. गिलने जानेवारी महिन्यात 567 धावा ठोकल्या. यात त्याने तीन शतकी खेळी केल्या.
गेल्या महिन्यात त्याने हैदराबादमध्ये न्यूझीलंड विरूद्ध आपले पहिले द्विशतक ठोकले. त्याने 149 चेंडूत नाबाद 208 धावा केल्या होत्या. त्यात त्याने 28 चौकार मारले होते. तो वनडेमध्ये द्विशतक ठोकणारा सर्वात तरूण फलंदाज ठरला.
गिलने या द्विशतकी खेळबरोबरच श्रीलंकेविरूद्ध 116 धावांची आणि न्यूझीलंड विरूद्ध 112 धावांची शतकी खेळी देखील केली होती.
गिलने ICC Men's Player of the Month पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि मोहम्मद सिराज यांच्याशी स्पर्धा करावी लागली. यानंतर गिल हा ऑक्टोबर 2022 नंतर ICC Men's Player of the Month पुरस्कार पटकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये हा पुरस्कार विराट कोहलीने जिंकला होता.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस