सिंधू, साईनाला पराभवाचा धक्का

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

कुचिंग (मलेशिया) - इंडिया ओपन सुपर सीरिज स्पर्धा जिंकल्यानंतर तीन दिवसांतच पी. व्ही. सिंधूला मलेशियन सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली, तर साईना नेहवालला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अकेन यामागुची हिचा झंझावात रोखता आला नाही.

इंडियन ओपन स्पर्धेतील विजेतेपदानंतर सिंधू आता चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दडपणाखाली कोलमडली असेच म्हणावे लागेल. तिला पहिल्या फेरीत चेन युफेई हिच्याविरुद्ध 21-18, 19-21, 17-21 अशी हार पत्करावी लागली. साईनाला 56 मिनिटांच्या या लढतीत 21-19, 13-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या गेममध्ये 11-8 अशी चांगली आघाडी असताना साईनाची पकड निसटली आणि त्याचा फायदा तिच्या जपानी प्रतिस्पर्धीने घेतला.

सिंधूने 68 मिनिटांच्या या लढतीत काहीशा अडखळत्या सुरवातीनंतर 12-12 बरोबरीनंतर सलग सहा गुण जिंकले होते. दुसऱ्या गेममध्ये 2-6 पिछाडीनंतर तिने 18-17 आघाडी घेतली होती; पण त्यानंतर तिला एकच गुण जिंकता आला. निर्णायक गेममध्ये 7-7 बरोबरीनंतर ती मागे पडत गेली. 9-11 पिछाडीनंतर तिने सलग पाच गुण गमावले, त्या वेळीच निकाल स्पष्ट झाला. मोक्‍याच्या वेळी दडपणाखाली तिला गुण जिंकता आले नाहीत, याचाच तिला फटका बसला.

अजयच्या विजयाचा दिलासा
अजय जयरामने भारताचे आशास्थान असलेल्या सिंधू, साईना पराजित होत असताना पहिल्या फेरीचा अडथळा पार करीत दिलासा दिला. त्याने चीनच्या क्विओ बिन याला 21-11, 21-8 असे सहज हरवले. दोघांच्या जागतिक क्रमवारीत फारसा फरक नाही; पण अजयने सरस खेळ केला. पहिल्या गेममधील 0-4 पिछाडीनंतर त्याने सलग सहा गुण जिंकत आघाडी घेतली आणि त्यानंतर सलग आठ गुण जिंकत निकालच स्पष्ट केला.

Web Title: sindhu, saina defeat in first match