योग्य वेळी सावरत सिंधूची विजयी सलामी

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

जगज्जेत्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात करून चाहत्यांना दिलासा दिला. तिला गेल्या तीनपैकी दोन स्पर्धांत पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली होती. त्यामुळे हा विजयही समाधान देणारा आहे.

मुंबई : जगज्जेत्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात करून चाहत्यांना दिलासा दिला. तिला गेल्या तीनपैकी दोन स्पर्धांत पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली होती. त्यामुळे हा विजयही समाधान देणारा आहे.

सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली हिचे आव्हान 21-15, 21-13 असे दोन गेममध्येच परतवले; मात्र तिची कामगिरी पूर्णपणे जागतिक विजेतीस साजेशी नव्हती. सिंधूचा हा मिशेल लीविरुद्धच्या आठ सामन्यांतील सहावा विजय आहे. दोघींच्या जागतिक क्रमवारीत फारसा फरक नाही, सिंधू सहावी आहे, तर मिशेल आठवी; तरीही त्यांची पहिल्या फेरीतच लढत झाली.

पॅरिसमधील या स्पर्धेत जम बसण्यास वेळ लागलेली सिंधू सुरुवातीस 2-5 मागे होती; पण तरीही तिच्या खेळात पुरेशी हुकुमत नव्हती. तिने 6-7 पिछाडीनंतर 12-9 आघाडी घेतली आणि त्यानंतर एका टप्प्यात सलग पाच गुण जिंकत गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये पुन्हा सुरुवातीस सिंधूच्या चुका झाल्या; पण योग्य वेळी सावरत सिंधूने 15-10 आघाडी घेत लढतीचा निर्णय स्पष्ट केला.

दरम्यान, शुभंकर डे याने काही वर्षांपूर्वी जागतिक क्रमवारीत तिसरा असलेल्या टॉमी सुगिआर्तो याला 15-21, 21-14, 21-17 असे 78 मिनिटे चाललेल्या लढतीत पराजित केले. शुभंकरचा सुगिआर्तोविरुद्धचा हा तिसरा विजय आहे.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sindhu won the opening match in french open