सिंधूचा एकमेव विजय; दुहेरीत आश्वासक लढत

मंगळवार, 23 मे 2017

मुंबई - भारतास सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतील सलामीच्या साखळी लढतीत डेन्मार्कविरुद्ध १-४ पराभव पत्करावा लागला; पण सिंधूच्या विजयाबरोबरच मिश्र आणि महिला दुहेरीतील कडवी लढत ही भारताची जमेची बाजू ठरली आहे.

मुंबई - भारतास सुदीरामन कप सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतील सलामीच्या साखळी लढतीत डेन्मार्कविरुद्ध १-४ पराभव पत्करावा लागला; पण सिंधूच्या विजयाबरोबरच मिश्र आणि महिला दुहेरीतील कडवी लढत ही भारताची जमेची बाजू ठरली आहे.

ऑस्ट्रेलियातील वेस्ट कोस्टमधील स्पर्धेत सांघिक लढतीत दुहेरी ही भारताची कायम कमकुवत बाजू मानली जाते; मात्र या वेळी वेगळेच दिसले. अश्विनी आणि सिक्की रेड्डीने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या असलेल्या डेन्मार्कच्या जोडीविरुद्ध मॅच पॉइंटही मिळवला होता. चारेक मॅच पॉइंट वाचवल्यावर अश्विनी - सिक्कीने मॅच पॉइंट मिळवला होता; पण तो सत्कारणी लावता आला नाही. अश्विनीने मिश्र दुहेरीतही चांगली चमक दाखवली. तिने सात्विकराजच्या साथीत डेन्मार्कच्या जोडीला तीन गेमपर्यंत कडवी लढत दिली. अजय जयराम जागतिक क्रमवारीत तिसऱ्या असलेल्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेन याच्याविरुद्ध दोन गेममध्येच पराजित झाला. अजयने यापूर्वी व्हिक्‍टरला दोनदा हरवले आहे; पण तो सामन्यात १९ गुणच जिंकू शकला. पुरुष दुहेरीत मनू अत्री - सुमीत रेड्डीचा पराभव पूर्ण एकतर्फी नव्हता, हेच समाधान लाभले. ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने लौकिकास साजेसा खेळ केला. पहिल्या गेममध्ये तिला झुंजावे लागले; पण दुसरा गेम तिने झटपट संपवला. 

निकाल : भारत पराजित वि. डेन्मार्क १-४ (अश्विनी पोनप्पा - सात्विकराज पराभूत वि. जोशीम फिशर - ख्रिस्तियाना पेडेरसन १५-२१, २१-१६, १७-२१. अजय जयराम पराभूत वि. व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेन १२-२१, ७-२१. सुमीत रेड्डी - मनू अत्री पराभूत वि. बोए मथायस - मॉगेनसेन कार्लसन १७-२१, १५-२१. पी. व्ही. सिंधू वि.वि. लिने किएफेल्ट २१-१८, २१-६. अश्विनी पोनप्पा - सिक्की रेड्डी वि.वि. रायतर कॅमिला - पेडेरसन ख्रिस्तियाना २१-१८, १५-२१, २१-२३).