सिंधू-मरिन आज पुन्हा मुकाबला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

ऑलिंपिक रौप्यपदक विजेतीचा पहिला गेम गमावल्यावर विजय 
मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला सिंगापूर ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या लढतीत विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. आता तिची लढत उद्या पारंपरिक प्रतिस्पर्धी कॅरोलिन मरिनविरुद्ध होईल. सिंधूकडून विजयाच्या हॅटट्रिकचीच चाहत्यांना आशा आहे. 

ऑलिंपिक रौप्यपदक विजेतीचा पहिला गेम गमावल्यावर विजय 
मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला सिंगापूर ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या लढतीत विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. आता तिची लढत उद्या पारंपरिक प्रतिस्पर्धी कॅरोलिन मरिनविरुद्ध होईल. सिंधूकडून विजयाच्या हॅटट्रिकचीच चाहत्यांना आशा आहे. 

सिंधूने सिंगापूरला सुरू असलेल्या या स्पर्धेत सलग दुसऱ्या लढतीत पहिला गेम गमावला. पहिल्या फेरीतील विजयानंतर सिंधूने त्यावेळी पहिल्या गेममध्ये मूर्खासारख्या चुका केल्या, असे पत्रकार परिषदेत सांगितले होते. फित्रियानी हिच्याविरुद्धच्या लढतीतही हेच घडत होते, पण सिंधूने स्वतःला चांगले सावरत 19-21, 21-17, 21-8 असा विजय मिळविला. आता सिंधूची लढत तिची पारंपरिक प्रतिस्पर्धी कॅरोलिन मरिन हिच्याविरुद्ध होईल. 

रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील निर्णायक लढतीत सिंधू मरिनविरुद्ध पराजित झाली होती, पण त्यानंतर सिंधूने मरिनला सुपर सीरिजच्या अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत, तसेच दिल्लीतील इंडिया ओपन स्पर्धेतील निर्णायक लढतीत हरवले होते. आता दोघींत उपांत्यपूर्व फेरीतच लढत होईल. सिंधू दुसऱ्या फेरीची लढत तीन गेममध्ये जिंकत असताना मरिनने तैवानच्या चिआ सिन ली हिचा 21-7, 21-11 असा सहज पाडाव केला. 

सिंधूसाठी मरिनविरुद्धची लढत खूपच महत्त्वाची असेल. दिल्लीतील विजयामुळे सिंधू जागतिक क्रमवारीत पाचवी झाली होती, पण मलेशियात पहिल्याच फेरीत पराजित झाल्यामुळे ती पुन्हा पाचव्या क्रमांकावर आली आहे. फित्रियानीविरुद्ध सिंधूचा जम बसण्यास वेळ लागला. तिने पहिल्या गेममध्ये 3-7 पिछाडीनंतर चांगला प्रतिकार करीत 19-19 बरोबरी साधली होती, पण हा गेम तिच्या हातून निसटलाच. दुसऱ्या गेममध्ये 8-7 आघाडीनंतर तिने हुकूमत घेतली ती सामना संपेपर्यंत कायम राखली. 

साईप्रणीतने ड्रॅगनला हरविले 
भारतीय बॅडमिंटन म्हणजे सिंधू, साईनाच नव्हे हे दिसू लागले आहे. साईप्रणीतने पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठताना चीनच्या क्वाओ बिन याला 21-15, 21-23, 21-16 असे नमवले. पहिला गेम सहज जिंकलेल्या साईप्रणीतला दुसऱ्या गेममध्येही संधी होती. ही तो साधू शकला नाही, पण तिसऱ्या गेममध्ये 11-6 आघाडी घेतल्यावर निकालच स्पष्ट झाला. 

अश्‍विनी पोनप्पा-बी. सुमीत रेड्डीने मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांनी जाए वान किम - ली सो ही या कोरियाच्या जोडीस 17-21, 21-17, 21-16 असे हरविले. 

कोर्टवरील वातानुकूलित यंत्रणेतून येणाऱ्या वाऱ्याशी जुळवून घेण्यात सिंधूला सुरवातीस त्रास होत आहे. हेच दोन्ही दिवशी घडले. त्यानंतर तिने केलेला प्रतिकार जबरदस्त आहे. तिसऱ्या गेममध्ये एकतर्फी वर्चस्व राखल्यामुळे तिचा आत्मविश्‍वास चांगलाच उंचावला आहे. 
- पुल्लेला गोपीचंद, सिंधूचे मार्गदर्शक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: singapur open badminton competition